कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे अखेर मनोमीलन झाले. कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांनाही वडिलकीच्या नात्याने समजावल्याने या तरुण नेत्यांनी हाडवैराला तिलांजली देत एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वैरत्वाचे कारण असलेला ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघातील तिढा पवार यांनी अत्यंत चपलाकपणे सोडवला आहे. आमदार पाटील हे विधान परिषदेवर कायम राहतील आणि ‘दक्षिण’ मतदारसंघातून खासदार महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांना तर ‘कोल्हापूर उत्तर’ मधून आमदार पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना उतरवून निवडून आणण्याची जबाबदारी दोघांनीही घ्यायची आहे, असा अलिखित समझोताही झाला आहे.महाडिक-सतेज पाटील यांच्या मधील हाडवैर साऱ्या राज्याला माहिती आहे. एकेकाळचे जीवलग मित्रांमध्ये राजकारणातून ठिणगी पडली आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचे वणव्यात रूपांतर झाले. लोकसभा निवडणुकीत ही आग विझवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केला, पण अधिकच धुमसत राहिली. सतेज पाटील यांनी लोकसभेला मदत केलीच नाही, असे सांगत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक यांनी चुलत बंधू अमल महाडिक यांना भाजपची उमेदवारी देत निवडून आणले. त्यानंतर मात्र धुमसणा-या राजकारणाने उग्र रूप धारण केले.खासदार महाडिक व आमदार पाटील हे दोन तरुण व आक्रमक नेते आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात या दोघांच्या ताकदीचा वापर करता येऊ शकतो, याची जाणीव शरद पवार यांच्या सारख्या मुत्सद्दी नेत्याला नाही म्हणणे फारच धाडसाचे होईल. महाडिक, सतेज पाटील यांच्यात मतभेद आहेतच त्यात खासदार महाडिक यांची भाजपशी वाढलेल्या जवळिकतेमुळे हसन मुश्रीफ यांचाही त्यांना विरोध आहे. मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना पक्षात आवतन देऊन महाडिक यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न केला असला तरी मंडलिक यांनी शिवसेनेतूनच लढण्याची तयारी केल्याने राष्ट्रवादीची गोची झाली आहे. महाडिक भाजप तर मंडलिक सेनेकडून लढले तर मुश्रीफ यांना दोन्ही कॉँग्रेसची उमेदवारी घ्यावी लागेल. तिरंगी लढतीत येथील जागा अडचणीत येऊ शकते, याचे पक्के गणित पवार यांच्याकडे आहे. भाजपला महाराष्ट्रात रोखण्याची सारी जबाबदारी कॉँग्रेसने पवार यांच्यावर सोपवली आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र पिंजून काढत असून जिथे जिथे दोन्ही कॉँग्रेससह राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद आहेत, तिथे मिटवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेबरोबरच लोकसभेची एक-एक जागा पवार यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा सुरक्षित करण्यासाठी त्यांनी आडाखे बांधले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या साक्षीने महाडिक व सतेज पाटील यांच्या सोबत आठ दोन दिवसापुर्वी मुंबईत गुप्त बैठक घेऊन समझोता घडवून आणला आहे. लोकसभा, विधानसभा एकाचवेळी होणार असल्याने लोकसभेसाठी राष्ट्रवादी आघाडीकडून धनंजय महाडिक आणि विधानसभेसाठी ‘दक्षिण’ मधून राष्ट्रवादीतर्फे अरूंधती महाडिक तर ‘उत्तर’ मधून कॉँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांना रिंगणात उतरले जाणार आहे. सतेज पाटील हे विधानपरिषदेवर कायम राहतील.हातकणंले मतदारसंघातील पारंपारिक विरोधक ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी, माजी खासदार निवेदिता माने व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यातही महत्वपुर्ण समेट घडवण्यात पवार यांना यश आले. अलिकडे शेट्टी यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आहे. भाजपला रोखण्यासाठी त्यांनीही महाराष्ट्र पिंजून काढला आहे. हातकणंगले लोकसभेसाठी आघाडीच्या वतीने राजू शेट्टी यांना संधी द्यायची. त्याबद्दल्यात शेट्टी यांनी हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपुर, शिराळा या विधानसभा मतदारसंघात दोन्ही कॉँग्रेसला मदत करायची आहे. निवेदिता माने यांना धैर्यशील माने यांचे पुर्नवसन करायचे आहे, त्यांना इचलकरंजी मधून उतरवून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन सत्ता आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री करायचे. असा सत्तेचा फार्मुला पवार यांनी चार दिवसापुर्वी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या साक्षीने तिघांसमोर मांडला, त्यास शेट्टी, माने व आवाडे यांनी मान्यता दिली आहे.दोन्ही लोकसभा मतदारसंघ सुरक्षित करत असताना पवार यांनी त्या अंतर्गत येणा-या बारा विधानसभा मतदारसंघही मजबूत केले आहेत. बारा पैकी अकरा मतदारसंघात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणण्याची रणनीती पवार यांनी आखली आहे.( आजची 1 एप्रिल ही तारीख लक्षात घेता वाचकांनी या बातमीकडे केवळ मनोरंजनाच्या हेतूने बघावे.)
सतेज पाटील-धनंजय महाडिक यांचे मनोमीलन, भाजपाला रोखण्यासाठी शरद पवार यांची मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2018 9:45 AM