कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. साखर उत्पादनासंदर्भात दोघांमध्ये बैठक होणार आहे. कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. साखर उत्पादनसंदर्भात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. यंदा देशात साखरेचं गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवाय, 60 टक्के साखरेवर सेस लावून, रक्कम उत्पादकांना द्यावी. तसंच साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणीदेखील पवार यांनी यावेळी केली आहे.
''नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांनी धमकावू नये''
दरम्यान, नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी धमकावू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी दिला. पवार म्हणाले, या प्रकल्पावरून सुरू असलेले राजकारण योग्य नाही. राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणारा हा प्रकल्प आहे. कोकणात नाही जमीन मिळाली, तर प्रकल्प गुजरातला जाईल असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. गुजरातला किंवा अन्य राज्यात हा प्रकल्प गेला तरी तो देशातच आहे. गुजरात काय पाकिस्तानमध्ये नाही. कोकणातील जनतेचे किंवा त्या प्रदेशाचे हा प्रकल्प झाल्यावर अहित होणार असेल तर त्या लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. हा प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी 10 मे रोजी मी प्रकल्पस्थळास भेट देणार आहे. पण तिथे सभा वगैरे घेणार नाही, असे पवार यांनी सांगितले.
शरद पवारांचा चंद्रकांत पाटील यांना सवाल
कोठड्या भरण्यासाठी कोणाची वाट पाहताय, असा सवालही यावेळी शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला.मुंबईतील भाजपा मेळाव्यात भुजबळ यांच्या शेजारी 2-3 कोठड्या शिल्लक असल्याचे वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले होते. यावर पवार म्हणाले की, " राज्यात सत्ता तुमचीच आहे, त्यामुळे कोठड्या भरण्यासाठी वाट कशाची बघताय..? आमची त्यास हरकत नाही. उलट तुरुंगात जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते. चंद्रकांतदादा काय बोलतात त्यांच्या बद्धल न बोललेच बरे. मुख्यमंत्री नागपूरचे असले तरी कोल्हापूर सत्तेचे उपकेंद्र झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माहीत नसलेल्या गोष्टीही ते जाहीर करून टाकतात. आयुष्यात माणसाला एखादी गोष्ट कधीतरी मिळाली की सकाळ, दुपार, संध्याकाळ तो काही बोलत सूटतो असे त्यांचे झाले आहे. आता त्यांनी एकदा थेट निवडणूक लढवून दाखवावी म्हणजे त्यांना लोकांकडून अजून काही चांगले शिकायला मिळेल असा टोला ही पवार यांनी लगावला.