Sharad Pawar: 'देशात ईडीचा वापर, तुमची देशाला गरज, राजीनाम्यावर विचार करा'; मोठ्या बहिणीची शरद पवारांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 03:59 PM2023-05-02T15:59:05+5:302023-05-02T16:18:39+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली. राजीनाम्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार यांच्या मोठ्या बहिण सरोज पाटील यांनीही प्रतिक्रिया देत राजीनामा पाठिमागे घेण्याची मागणी केला आहे.
शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार
सरोज पाटील म्हणाल्या, आता मी दुपारी अतिशय दु:खदायक बातमी ऐकली आणि मला धक्का बसला. देशात अराजकता माजली आहे, लोकशाही जगते की नाही असा प्रश्न आहे. अतिशय अस्वस्थ वातावरण असताना शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील लोकांना हा निर्णय पचेना झाला आहे. शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, सध्या देशात संविधान पायदळी तुडवले जात आहे. ईडीचा वापर होत आहेत. त्यामुळे अशा काळात शरद पवार यांची देशाला गरज आहे. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, शरद पवार यांनी विरोधकांना कधीही वाईट शब्दात उत्तर दिलेलं नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा याच मला दु:ख वाटत आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी सरोज पाटील यांनी केली. (Maharashtra politics)
"आता त्यांची बाजू सांगते शरद पवार म्हणतात मी बरेच वर्ष खुर्चीवर बसलो. माझी प्रकृती साथ देत नाही, वय वाढत आहे. पर्यायी माणूस तयार व्हायला पाहिजे, हे सगळ बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्यासारखे पर्यायी नेतृत्व तयार करा आणि मग खुर्ची सोडा, अजुनही आमच्यासमोर तुमच्यासारखा नेता दिसत नाही, असंही सरोज पाटील म्हणाल्या.
'महाराष्ट्राच खूप नुकसान होईल. राष्ट्रवादी (NCP) पक्ष दुबळा होईल. लोक खूप अवस्थ झाले आहेत. मला राज्यभरातून अनेक लोकांचे फोन आले आहेत. लोकांच्या भावना ओळखाव्यात आणि राजीनामा परत घ्यावा. पण, दुसरीकडे आम्हाला तो हवा आहे, आमचा तो भाऊ आहे. त्याची प्रकृती चांगली पाहिजे. हाही आमचा स्वार्थ आहे. यामुळे या राजीनाम्यावर शरद पवार यांनी विचार करावा असं मला वाटतं, अशी भावनिक साद सरोज पाटील यांनी घातली.