एकनाथ पाटीलकोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील अंतर्गत राजकारणाचा फटका कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना बसला आहे. मटकाचालक सलीम मुल्ला रॅकेट प्रकरणातील संशयितांच्या नातेवाइकांना भेटायला दिल्याच्या कारणातून शेळके यांची प्रशिक्षणाच्या नावाखाली तडकाफडकी बदली केली असून, पुण्यामध्ये त्यांची वरिष्ठांकडून पिळवणूक होत आहे.
आता पुन्हा कारागृहाकडे पाठविणार नसल्याचा फतवा काढून त्यांना पुण्यामध्येच तिष्ठत ठेवले आहे. या अन्यायाविरोधात शेळके यांनी राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्याकडे दाद मागितली आहे. कैद्यांमध्ये केलेली सुधारणा, कारागृहाचा कायापालट यांसह उद्योग-व्यवसाय सुरू करून राज्यात कारागृह अव्वलस्थानी नेऊन ठेवणाऱ्या अधिका-यावर झालेल्या अन्यायाची चर्चा कारागृह प्रशासनात आहे.
यादवनगर-पांजरपोळ येथे ८ एप्रिल २०१९ च्या रात्री मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह त्यांच्या पथकावर माजी उपमहापौर शमा मुल्ला, तिचा पती सलीम मुल्ला याच्यासह ४०० जणांच्या जमावाने हल्ला करीत बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी या टोळीवर ‘मोक्का’ कारवाई केली.
सलीमच्या संपर्कात असणाºया मटका-जुगाराचे मुंबईतील म्होरके प्रकाश सावला, जयेश शहा, वीरज सावला, जितेंद्र गोसालिया, राजेंद्र टोपी यांच्यासह स्थानिक सम्राट कोराणे, मनीष अग्रवाल यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. ‘मोक्का’ कारवाईतील संशयित कळंबा कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात. मुंबईतील प्रकाश व वीरज सावला यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील कारागृहाबाहेर आले होते. त्यांना चालता येत नसल्याने ते स्ट्रेचरवरून आले होते.
मुलाखत कक्षामध्ये भेट न देता कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर सावला बंधूंची वडिलांसोबत भेट घालून दिली. अशा भेटी कारागृहात देत असतात. कारागृह अधीक्षकांना तसे अधिकार आहेत; परंतु सावला बंधू आणि वडिलांच्या भेटीचे पोलिसांनी व्हिडीओ चित्रीकरण करून तसेच या गुन्ह्याच्या तपास अधिकारी उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी राज्याचे कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांना तसे पत्र पाठविले. त्याची दखल घेत कारागृह अधीक्षक शेळके यांना एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविले.
या ठिकाणी त्यांना मानसिक त्रास आणि पिळवणुकीची वागणूक दिली जात आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण होऊनही त्यांना माघारी पाठविलेले नाही. आता त्यांना कोल्हापूरला पाठविणार नसल्याची भूमिका वरिष्ठांनी घेतल्याने शेळके गृहखात्याकडे दाद मागणार आहेत. कळंबा कारागृहातील अंतर्गत राजकारणाचा फटका शेळके यांना बसल्याची चर्चा आहे.अन्यायाची मालिकाच काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन बंदी संतोष पोळ याच्याकडे पिस्तूल असल्याचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवरून प्रसारित झाला होता. या प्रकरणात कारागृह अधीक्षक शेळके यांची चौकशी करून २९ जानेवारीला विसापूर (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील खुल्या कारागृहात त्यांची तडकाफडकी बदली केली होती.
वरिष्ठ स्तरावर झालेल्या चौकशीमध्ये निलंबित १४ कर्मचाऱ्यांसह शेळके निर्दोष झाले होते. त्यानंतर ११ मे रोजी शासनाने पुन्हा कळंबा कारागृह अधीक्षकपदी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते.
कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना प्रशिक्षणासाठी पुण्याला बोलावून घेतले आहे. त्यामुळे येथील प्रभारी पदभार माझ्याकडे आहे.- हरिश्चंद्र जाधवर : प्रभारी अधीक्षक