कोल्हापूर : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक रोखे खरेदी प्रकरण चव्हाट्यावर आले असून, त्याच्याशी कोल्हापूर कनेक्शनही उघड झाले आहे. कोल्हापुरातील एका अवघे एक लाख मंजूर भागभांडवल असलेल्या स्थापत्य कंपनीने तब्बल ३ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केल्याचे व ते भाजपला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे.नॉन मेटॅलिक मिनरल प्रॉडक्टसची उलाढाल करणारी या कंपनीची स्थापना २८ ऑक्टोबर २०२० ची आहे. या कंपनीने लगेच दोन वर्षांच्या उलाढालीनंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये तीन कोटींचे रोखे खरेदी केले आहेत. या कंपनीचे कार्यालय शाहू मिलजवळ एका फ्लॅटमध्ये आहे. कंपनीचे मालक मूळचे गगनबावडा तालुक्यातील आहेत. ते इंजिनीयर आहेत. कोल्हापूर-गगनबावडा रोडवर त्यांनी अलीकडेच बंगला बांधला आहे. परंतु स्थानिक पातळीवर त्यांचा फारसा संपर्क नाही. कोल्हापुरात जिल्हा परिषदेची कामेही ते करत असल्याचे समजते. परंतु आता ते कोकणासह राज्यभरात मुख्यत: जलसंपदाची मोठ्या तलावांची कामे घेत असल्याची माहिती आहे. राज्य सरकारमधील एका वजनदार दादा मंत्र्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. या कंपनीमध्ये मालकासह कुटुंबातील दोन महिला संचालक आहेत. केंद्र शासनाच्या कार्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या वेबसाइटवर कंपनीची त्रोटक माहिती उपलब्ध आहे. सत्तेतील पक्षाकडून कोट्यवधी रुपयांची कामे मिळवायची व त्याबदल्यात त्यांना वेगळ्या मार्गाने आर्थिक मदत करायची असा हा व्यवहार आहे.
भागभांडवल लाखाचे अन् देणगी दिली तीन कोटींची; कोल्हापुरातील कंपनीकडून निवडणूक रोख्यांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:05 PM