गडहिंग्लज आणि हुक्केरी तालुक्याच्या सीमेवरील कोचरी (ता. हुक्केरी) येथे हिरण्यकेशी नदीपासून सुमारे ४०० फूट अंतरावर रावसाहेब मगदूम या शेतकऱ्याची मालकीची विहीर आहे. दरम्यान, विहिरीनजीकची कृषिपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या विहिरीत मगर असल्याचे निदर्शनास आले. मगदूम यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी (दि. १२) दिवसभर वनविभागाने व ग्रामस्थांनी विहिरीत मगर आहे का याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला; परंतु मगर दिसली नाही.
दरम्यान, मगदूम यांनी स्वत: मगर पाहिली असल्याने त्यांनी शनिवारी (दि. १३) विहिरीतील सर्व पाणी उपसले. सर्व पाणी उपसल्यामुळे विहिरीत मगर दिसली; परंतु तब्बल २५० फूट खोल असणारी आणि विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे विहिरीत उतरणे अवघड होते. त्यामुळे मगरीला काठावरूनच वर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.
मगरीला पकडण्यासाठी टाकलेला गळ मगरीच्या मानेला दोनदा बसला. मात्र, मगरीच्या प्रचंड वजनामुळे गळ सुटून मगर विहिरीत पडली. त्यामुळे चिडलेल्या मगरीने आपले रूप दाखविण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिक व वनविभागाने दोरखंड व क्रेनची मोहीम थांबवली.
दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही मगरीला बाहेर काढण्यात यश न आल्याने हुक्केरी वनविभागाचे अधिकारी विष्णूवर्धन यांनी विशेष पथकाची मागणी केली आहे.
---------------------------------------------
* संयुक्त मोहीम राबवावी
हिरण्यकेशी नदीकाठावरील नांगनूर-अरळगुंडीदरम्यान गेली अनेक दिवस मगरीचे दर्शन होत आहे. जीवितहानी होण्यापूर्वी कर्नाटक-महाराष्ट्र वनविभागाने पुन्हा संयुक्त मोहीम राबवून मगरीला जेरबंद करणे गरजेचे आहे.
---------------------------------------------
फोटो ओळी : कोचरी (ता. हुक्केरी) नजीक २५० फूट खोल विहिरीत आढळलेल्या याच मगरीला बाहेर काढण्यासाठी नागरिक व वनविभागाचे गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत.
क्रमांक : १४०३२०२१-गड-०७