कोल्हापूर : सक्षम संस्था आयोजित ब्रेल लेखन स्पर्धेत वैष्णवी हजाम हिने, तर वाचन स्पर्धेत यश धुमाळ आणि अतुल भगत या अंध विद्यार्र्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
ब्रेल लिपीची कला जोपासण्यासाठी येथील सक्षम (समता क्षमताधिष्ठित एवं विकास अनुसंधान) या संस्थेने दोन गटांत ही स्पर्धा घेतली. विजेत्यांना येथील अंधशाळेत संक्रांतीनिमित्त बुधवारी (दि. १५) झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात आली. यावेळी तिळगूळ वाटप करण्यात आले.स्पर्धेचा निकाल भक्ती करकरे यांनी जाहीर केला. ब्रेल वाचन स्पर्धेतील इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ विजेते जाहीर करण्यात आले. यावेळी इयत्ता आठवी ते दहावी गटातील ब्रेल लेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. विविध शाळांतील ५२ अंध स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.प्रास्ताविक भाषणात लुई ब्रेल यांच्या जीवनपटाची माहिती ‘सक्षम’चे अध्यक्ष गिरीश करडे यांनी दिली. अंधशाळेचे निवृत्त शिक्षक वसंत सुतार, विकास हायस्कूलचे विशेष शिक्षक अजय वणकुद्रे यांनी ब्रेल लिपी का आवश्यक आहे, याविषयी माहिती दिली.
तत्पूर्वी ब्रेल प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘सक्षम’च्या उपाध्यक्ष डॉ. शुभांगी खारकांडे, गौतम कांबळे, क्षमा खोमणे, डॉ. चेतन खारकांडे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सारिका करडे आणि विनोद पालेशा यांनी केले.स्पर्धेचा निकाल- ब्रेल लेखन स्पर्धा(इयत्ता आठवी ते दहावी गट)- प्रथम - वैष्णवी विश्वास हजाम (विद्यापीठ हायस्कूल), द्वितीय - सुशांत मल्लिकार्जुन दाशाळ (विद्यापीठ हायस्कूल), तृतीय - गंगासागर विठ्ठल पातळे (विकास विद्यामंदिर),ब्रेल वाचन स्पर्धा :(इयत्ता आठवी ते दहावी गट) : प्रथम - अतुल विश्वनाथ भगत (विकास विद्यामंदिर), द्वितीय- कामिनी ज्ञानेश्वर गडदे (विकास विद्यामंदिर), तृतीय - नेताजी गोविंद काणेकर (विद्यापीठ हायस्कूल) (इयत्ता पाचवी ते सातवी गट) : प्रथम - यश मारुती धुमाळ (अंधशाळा), द्वितीय -पौर्णिमा सुरेश मर्दाने (अंधशाळा), तृतीय - स्नेहल संजय कचरे (अंधशाळा).