आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0४ : जिल्ह्यात मंगळवारी पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. काही वेळ ऊन, तर त्यानंतर जोरदार सरी कोसळत राहिल्याने ऐन आषाढात श्रावणाची प्रचिती अनुभवावयास येत आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस असून अद्याप विविध नद्यांवरील तेरा बंधारे पाण्याखाली आहेत.
गेले तीन-चार दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. मंगळवारी सकाळी खडखडीत ऊन पडले होते. नऊनंतर हलक्या सरी कोसळत राहिल्या. दुपारी पुन्हा ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिला. साधारणत: श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो; पण यंदा चक्क आषाढ महिन्यातच याची प्रचिती आली.
सायंकाळनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रात सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस घटप्रभा धरणक्षेत्रात ९० मिलिमीटर झाला आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी २१ फुटांपर्यंत खाली आली असून, अद्याप पंचगंगा नदीवरील सहा, भोगावती नदीवरील तीन, तर कासारी नदीवरील चार असे तेरा बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात एका घराची अंशत: पडझड होऊन सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
आज ‘तरणा’ पाऊस निघणार!
मृगाच्या हुलकावणीनंतर ‘आर्द्रा’ नक्षत्रकाळात जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिके जोमात आहेत. आज, बुधवारपासून ‘पुनर्वसू’ नक्षत्र निघत आहे. उत्तररात्री ४ वाजून ३९ मिनिटांनी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करीत असून वाहन ‘कोल्हा’ आहे. या काळातही चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.
तालुकानिहाय मिलिमीटरमध्ये पाऊस असा-
हातकणंगले- ४.५०, शिरोळ- ४.८५, पन्हाळा- १४.२८, शाहूवाडी- २०.३३, राधानगरी- ३२.६७, गगनबावडा- १९.५०, करवीर- ७.९०, कागल- २३.१४, गडहिंग्लज- १०.८५, भुदरगड- २३, आजरा- २४, चंदगड- ३३.८३.