कोल्हापूर : दत्तकपुत्र नावाखाली घेतलेल्या बारा वर्षांच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पुणे येथील राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निलंबित पोलीस उपअधीक्षक कुटुंबासह पसार झाला आहे. त्यांच्यासह पत्नी व मुलगी अशा तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) रात्री गुन्हा दाखल झाला. संशयित कुटुंबीयांचा शोध सुरू असून त्यांना अटक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
ताराबाई पार्क येथील घरी पीडित मुलाचा शारीरिक व मानसिक छळ करून त्याच्या गुप्तांगासह पाठीवर लायटरने असंख्य चटके दिले आहेत. जिन्यावरून ढकलून, भिंतीवर डोके आपटून मारहाण केली आहे. याप्रकरणी मंगळवार पेठ येथील शासकीय पुरुष राज्य निरीक्षक गृहाच्या समुपदेशक अश्विनी अरुण गुजर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये मुख्य आरोपी मुलगी आहे. तिच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. या तिघांवर भा. दं. वि. स. मारहाण (कलम ३२६), बाललैंगिक अत्याचार (५०४, ७ व ८), बाल न्याय अधिनियम (७५) नुसार गुन्हा दाखल केला. पीडित मुलगा बारा वर्षांचा आहे. मुलगी सतरा वर्षांची अल्पवयीन असल्याचे समजते. तिला ताब्यात घेतल्यानंतर ती अज्ञात की सज्ञान, हे स्पष्ट होणार आहे.
अशी घडली घटनासंशयित पोलीस उपअधीक्षक ताराबाई पार्क येथे पत्नी व मुलगीसह राहतो. २०१२ मध्ये त्याची मुलगी परिसरातील बागेमध्ये खेळत असताना पीडित मुलगा आईसोबत भंगार गोळा करण्यासाठी आला होता. बागेत खेळताना या दोघांची ओळख झाली. मुलीने वेफरचे पाकीट खायला देण्याचे आमिष दाखवून त्याला घरी नेले. आई-वडिलांना सांगून त्याला आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरला. मुलीचा आग्रह पाहून संबंधित दाम्पत्याने पीडित मुलाच्या आई-वडिलांना आम्हाला मुलगा नाही, तुमचा मुलगा दत्तक घेतो, तो आमच्या घरी रुळला आहे, असे सांगितले. मात्र, आई-वडिलांनी मुलग्याला त्यांच्या घरी ठेवण्यास नकार दिला. त्यावर पोलीस उपअधीक्षकाने तुमची परिस्थिती गरिबीची आहे. तुमच्याच मुलाचे चांगले होईल, असे सांगून जबरदस्तीने मुलाला ठेवून घेतले. त्यानंतर आक्रमक मुलीने आई-वडील घरी नसताना पीडित मुलाचा शारीरिक व मानसिक छळ केला. भिंतीवर डोके आपटून जिन्यावरून ढकलून दिले. त्याच्या गुप्तांगासह पाठीवर लायटरने असंख्य चटके दिले. मुलाने या सर्व त्रासाची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गेली सहा वर्षे हा मुलगा त्रास सहन करीत राहिला. त्याच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत असंख्य जखमा आहेत. आणखी काही दिवस तो या दाम्पत्याच्या सहवासात राहिला असता तर त्याच्या जिवाचे बरेवाईट झाले असते. ‘चाईल्डलाईन’ संस्थेने या मुलाची सुटका केल्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली.
जाणीवपूर्वक दुर्लक्षपोलीस खात्यामध्ये उपअधीक्षक पदावर असताना त्याला कायद्याची चांगली माहिती आहे. त्याने गरीब कुटुंबीयांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत मुलगा दत्तक घेतो, असे सांगून आपल्या घरी ठेवले. त्याच्या आई-वडिलांचा विरोध असतानाही जबरदस्तीने ठेवून घेतले. सहा वर्षांत मुलाला एकदाही आईला भेटू दिले नाही. त्याला बंद घरात कोंडून ठेवले. घरातील धुणी-भांडी, साफसफाई, आदी कामे करून घेतली. तो लहान आहे, त्याच्या शाळेचा, शिक्षणाचा विचार केला नाही. या सर्व गोष्टींकडे संबंधित पोलीस उपअधीक्षक व त्याच्या पत्नीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मुलीच्या गैरकृत्यांना पाठीशी घातले. पीडित मुलाच्या लैंगिक अत्याचाराला मुलीसह तिचे आई-वडीलही तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे समुपदेशक अश्विनी गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.पीडित मुलाची आई भयभीतपीडित मुलाचे आई-वडील कनाननगर येथे राहतात. आई धुण्या-भांड्याचे व भंगार गोळा करण्याचे काम करते. वडील मोलमजुरी करतात. ते गेल्या पाच वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे पीडित मुलगा सोडून आणखी दोन मुलांची जबाबदारी एकट्या आईवरच आहे. आपल्या लहान मुलावर जीवघेणा अत्याचार झाल्याचे समजताच तिने ‘चाईल्डलाईन’ संस्थेची मदत घेतली. पोलिसांत फिर्याद देऊ नये, अशी धमकीही संबंधित पोलीस उपअधीक्षकाने त्यांना दिली आहे. परिस्थितीने बेजार असलेले हे कुटुंब या घटनेमुळे भयभीत झाले आहे.संशयितांचा परिचयसंशयित पोलीस उपअधीक्षकाने २००९-२०१२ अशी तीन वर्षे कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे काम पाहिले आहे. दीड वर्षापूर्वी तो ‘खाबूगिरी’मध्ये निलंबित झाला आहे. त्याची पत्नी सुशिक्षित आहे. ती घरीच असते. संशयित आरोपी मुलीने सातवीमध्ये शाळा सोडली. त्यानंतर ती घरीच असते. ती म्हणेल ते लाड तिचे आई-वडील पुरवितात.पोलीस निरीक्षकाची चौकशी करावीअल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषणाची घटना उजेडात येऊन सतरा दिवस झाले. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल करण्यास विलंब लावणाºया पोलीस अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना बुधवारी दिले.