कोल्हापूर : आपला जीव आणि पोटात वाढणाऱ्या अंकुरास महापुराच्या पाण्यातून सुखरुपपणे बाहेर काढल्याबद्दल सहा महिन्याच्या गरोदर महिलेने भारतील लष्काराच्या अधिकाऱ्यांस राखी बांधून जवानांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केला. महापुराच्या संकटाचा मनावरील ताण हालका होताच महिलेने टी. ए. बटालियन येथे जाऊन बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जनरल आॅफीसर इन कमांड ललितकुमार यांना राखी बांधली आणि त्यांचे आभार मानले.प्रयाग चिखली, आंबेवाडी येथे मंगळवारी (दि. ६ आॅगस्ट) सकाळपासून पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी वाढायला लागली तशी आंबेवाडी ग्रामस्थांची भितीने गाळण उडाली. प्रत्येक व्यक्ती हताश होऊन देवाची याचना करत होती.जातपात, गरीब-श्रीमंत यातील दरी एक दणक्यात दूर झाली आणि सगळेच स्वत:ला वाचवण्यासाठी त्या विधात्याची विनवणी करु लागले. मदत काही पोहचत नव्हती. मंगळवारी दुपारनंतर लष्काराची एक बोट नजरेस पडली आणि साक्षात तो विधाताच मदतीला आला अशी भावना निर्माण झाली.आंबेवाडी येथे राहणाऱ्या सई संग्राम अतितकर या सहा महिन्याच्या गरोदर महिलेच्या कुुटुंबाला महापूराच्या पाण्याचा फटका बसला. घरातून बाहेर कसे पडायचे या विवंचनेत कुटंबिय होते. घरातील सगळेच काळजीत होते. पाणी वाढेल तसे सगळ्यांच्या ह्रदयाचे ठोके चुकायला लागले. काय करायचे, कसे होणार या काळजीने त्रस्त असलेल्या कुटुंबाच्या मदतीला लष्काराचे जवान धावून गेले.
सई तसेच त्यांचे पती संग्राम यांच्यासह सर्वांना बोटीत घेतले आणि शिवाजी पूलावर आणून सोडले. मानसिक धक्कयातून सावरल्यानंतर सई यांनी नुकतेच टी. ए. बटालियन येथे जाऊन त्या जवानांना राखी बांधायची होती. त्या तेथे गेल्या. परंतु त्यांचा बचाव करणारे जवान शिरोळला गेले असल्याने त्यांची भेट झाली नाही. म्हणून बचावकार्याचे नेतृत्व करणाऱ्या जीओएस ललितकुमार यांना राखी बांधून जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ना नात्यातील ना गोत्यातील तरीही रक्षा बंधनाच्या भावनिक कार्यक्रमाने जवान व सामान्य नागरीक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ केले.