सदाशिव मोरेआजरा : ती बी माणसचं हाईत ..घाबरू नगसा.. काय बी हुईत नाय.. हा संतोष दादाचा पाठीवरील शब्द जणू कोरोनाच्या संकटातही त्यांना लढण्याचे बळ देत आहे.
आजरा कोवीड सेंटरच्या स्वच्छतेपासून..कोरोनाने मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कारापर्यंत.., नाममात्र पगारावर काम आणि घरी भितीने स्वतंत्र राहायचे.. पीपीई कीट जणू पाचवीलाच पुजलेला...असा दिनक्रम गेल्या सव्वा वर्षांपासून आजरा नगरपंचायतीच्या सिक्स स्टार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सुरू आहे.आजऱ्यात सव्वा वर्षापूर्वी साळगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोरोना कोव्हीड सेंटर सुरू झाले. या ठिकाणची स्वच्छता व कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे काम नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी संतोष कांबळे, धीरज ससाने,जयवंत कांबळे, बाबुराव कांबळे, मारुती कांबळे, राजाराम कांबळे या सिक्स स्टारनी जणू विडाच उचलला सारखे सुरू ठेवले आहे.
पीपीई किट घालूनच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या रुमची स्वच्छता करणे,त्याठिकाणच्या कचऱ्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावणे, कोव्हीड सेंटरमध्ये मयत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे. यासह कोव्हीड सेंटरमधील कामे नित्यनेमाने या सहा जणांच्या कडून केली जात आहेतकोरोनाने मयत झालेल्यांच्या घरातील व्यक्ती अंत्यसंस्काराला व रक्षाविसर्जनलाही येत नाहीत. दिवस असो वा रात्र याच सहा जणांनी मयत झालेल्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बंद करायचे व त्याला अँब्युलन्स मधून स्मशानभूमीत घेऊन जायचे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे. पण मयतांच्या घरातील कोणाचाही साधा फोनही येत नाही.
अंत्यसंस्कारानंतर घरी यायचे, घरातील व्यक्ती दारात पाणी ठेवतात त्याच ठिकाणी अगोदर सॅनीटायझर करुन घ्यायचे, दिलेल्या पाण्यात डेटॉल लिक्विड टाकून आंघोळ करायची. घरातील एकाच सोप्यात बसायचे व त्याच ठिकाणी जेवायचे तिथेच झोपायचे असा दिनक्रम सुरू आहे.कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीवर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना भीती वाटते. मात्र संतोष दादाचे धीर देणारे एकच वाक्य असते. " ती बी माणसंच हाईत.. घाबरू नगसा.. काय बी हुईत नाय..." मग पुन्हा कामाला लागायचे आणि अंत्यसंस्कार करायचे. आणि त्याच अँब्युलन्स मधून घरी परतायचे. नगरपंचायतीकडून मिळणारा पगारही तुटपुंजा त्यामुळे उदरनिर्वाह करतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण धाडसाने कोरोनात काम केल्याचे समाधान मिळते असे धीरज ससाने यांनी दै. लोकमतशी बोलताना सांगितले.