राम मगदूम। गडहिंग्लज : हेब्बाळ काानूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या चौरंगी निवडणुकीत एकच जागा मिळालेल्या 'युवा परिवर्तन पॅनेल'च्या 'प्रमोदिनी'ने खऱ्या अर्थाने परिवर्तन घडविले. आरक्षण नसतानाही तिला सरपंचपद देऊन जनता दलाने राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. दहा वर्षांनंतर झालेल्या सत्तांतरात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या तरुणीचे नाव आहे प्रमोदिनी महादेव कांबळे.
याठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादी, विरोधी जनता दल, भाजप आणि युवा परिवर्तन अशी चौरंगी लढत झाली होती. त्यात राष्ट्रवादी व जनता दलाला प्रत्येकी ५, तर 'परिवर्तन'ला १ जागा मिळाली. त्यामुळे स्पष्ट बहुमताअभावी सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता.
निकालानंतर 'परिवर्तन'ला आपल्या सोबत घेऊन सत्ता अबाधित राखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. त्यावेळी परिवर्तनने पहिल्या टप्प्यात अडीच वर्षे सरपंचपदाची मागणी केली. त्याला राष्ट्रवादीकडून ठोस प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, जनता दलाने 'परिवर्तन'ला दोन वर्षे सरपंचपद देण्याचे निश्चित करून त्या पॅनेलकडून निवडून आलेल्या प्रमोदिनीसह सहा सदस्यांची हेब्बाळ ग्रामविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे एकटीच निवडून आलेली असतानादेखील तिला 'सरपंच'पदाचा बहुमान मिळाला.
याकामी बाळासाहेब शिंदे, सुनील शिंदे, गजानन पाटील, रामचंद्र गवळी व राजेंद्र गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यासंदर्भात विचारले असता ती म्हणाली, केवळ नशीब म्हणूनच सरपंचपद मिळाले. त्याचे आश्चर्य व आनंद आहे. गावासाठी खूप काही करायचे आहे. शुद्ध पाण्यासाठी नवीन नळयोजना, नदीघाटापर्यंत मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, गावातील गटारी व रस्त्यांची बांधणी आणि गरिबांच्या घरकुल उभारणीला प्राधान्य देणार आहे.
--------------------------
* आरक्षण नसतानाही सरपंचपद
हेब्बाळचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होते; परंतु सत्तासंघर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रमोदिनीला सरपंचपदाची लॉटरी लागली. ती बी.ई. कॉम्प्युटर आहे. १९९५ मध्ये तिचे चुलते बसाप्पा यांच्या रूपाने आरक्षणामुळे अनुसूचित जातीला पहिल्यांदाच सरपंचपद मिळाले होते. दरम्यान, २००० मध्ये राष्ट्रवादीकडून नशीब आजमावलेल्या तिच्या वडिलांचा थोडक्यात पराभव झाला होता; परंतु आरक्षण नसतानाही 'प्रमोदिनी'ला थेट सरपंचपद मिळाले.
--------------------------
* प्रमोदिनी कांबळे : २५०२२०२१-०२