कोल्हापूर : राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षपदी आयेशा सलीम शेख यांची निवड झाली. निवडीचे पत्र संघटनेच्या महासचिवांनी दिले.
फोटो : ०३०३२०२१-कोल-आयेशा शेख
ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे निबंध स्पर्धा
कोल्हापूर : शाहूपुरीतील राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे वार्षिक अहवाल व निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
निबंध स्पर्धेसाठी एकाकी ज्येष्ठ नागरिकांच्या कथा व व्यथा, ज्येष्ठ नागरिक संघटना, संघय यांची संख्यात्मक व गुणात्मक स्थिती, समस्या व उपाय, कोरोना कालावधीत काय गमावले, कमावले, शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण, अंमलबजावणी, ज्येष्ठांसाठी योग, आध्यात्म, असे विषय आहेत. यासाठी आठशे शब्दांची मर्यादा आहे. अहवाल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सेवा संघांना सहभागी होता येणार आहे. हा अहवाल २०१०-२० असावा. उत्कृष्ट अहवालास ५००, ३००, २०० व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. तरी हे साहित्य २१ मार्च २०२१ पूर्वी प्राचार्य डाॅ. मानसिंगराव जगताप , रा. सम्राट सोसायटी, स्वीमिंग टँकजवळ, राजारामपुरी आठवी गल्ली येथे पाठवावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.
राजर्षी शाहू महाविद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धा
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भित्तीपत्रक
स्पर्धेत आदित्य आरबुणे (शाहू काॅलेज) याने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील अन्य विजेते असे, अझरुद्दीन मुल्लाणी (सी.एस.एस.काॅलेज, हुपरी) याने द्वितीय व सोपान पाटील (शाहू काॅलेज ) याने तृतीय क्रमांक व ऋतुजा पाटील (प्रा. एन.डी.पाटील काॅलेज, मलकापूर) यांने उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डाॅ. व्ही.एन.शिंदे होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. एस.टी.साळुंखे होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डाॅ. मानसी पाटील, डाॅ.प्रकाश कांबळे, डाॅ. बाळासाहेब सुतार, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. संध्या माने, प्रा. विनोद अवघडे यांनी काम पाहिले.
जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाची सभा उत्साहात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगलधाम येथे उत्साहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी होते.
सभेच्या सुरुवातीला शहीद सैनिकांना मंत्रपठणाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक संचालक मंदार जोशी यांनी, तर इतिवृत्त वाचन कार्यवाह सुनील कुलकर्णी यांनी केले. अहवाल वाचन खजानिस पुरुषोत्तम निगुडकर यांनी केले. शंकांचे निरसन लेखापरीक्षक प्रशांत देशपांडे (सीए) यांनी केले. सभासद योजना व नियोजित इमारतीसंबंधी माहिती कायदेशीर सल्लागार अमोघ भागव यांनी दिली. यावेळी अध्यक्ष प्रसाद निगुडकर, संचालक आत्माराम नाईक, सचिन पितांबरे, नागराज जोशी, नीलेश कुलकर्णी , स्वप्निल जोशी, आदी उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धा
कोल्हापूर : आद्यशक्ती जनफौंडेशनतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरीता उखाणे, रांगोळी, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा सोमवारी (दि.८) आयोजित केली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यात सहभागी स्पर्धकांनी एक मिनिटांचा व्हीडीआे व फोटो फौेडेशनकडे पाठवावेत. अशी माहिती अध्यक्षा ॲड. संगीता तांबे यांनी पत्रकाद्वारे दिली.
कचरा वेचक महिलांना कायमस्वरूपी रोजगार द्या
कोल्हापूर : कचरा वेचक मिहलांच्या बचतगटांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे, जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा. या मागणीसाठी वसुधा कचरा वेचक संघटनेतर्फे बुधवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेतर्फे कचरा वेचक महिलांच्या हाताला काम देऊन सहकार्य करावे. झूम प्रकल्प बावडा डंपिंग ग्राऊंड येथील कचरा वर्गीकरण ठेका संस्थेच्या बचतगटांना द्यावा. शहरात वाॅर्डनुसार कचरा वर्गीकरण केंद्र स्थापन करावे. हे केंद्र संस्थेस चालविण्याची संधी द्यावी. मनरेगा शहरी भागासाठी लागू करावी. ई-कचरा संकलन केंद्र स्थापन करून तोही संस्थेत चालविण्यास द्यावा. यासह अन्य मागण्यांचे निवेदन संस्थेच्यावतीने आयुक्तांना दिले. यावेळी अध्यक्षा आक्काताई गोसावी, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, जरीना बेपारी, हसिना शेख, सविता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, किरण नाईक, संगीता लाखे आदी उपस्थित होत्या.