कोल्हापूर : लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा, या मागणीसाठी शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात निदर्शने केली. बिल वसुलीसाठी सक्ती केली तर महावितरणविरोधात संघर्ष सुरू होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि लोकांच्या हातचे काम गेले. तीन-साडे तीन महिने लोक घराबाहेर पडले नाहीत. अनेकांचे रोजगार गेल्याने जगणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत महावितरणने दिलासा देण्याऐवजी भरमसाट बिले वाढवून ग्राहकांना झटका दिला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी पैसे भरलेले नाहीत आणि आता महावितरणने वसुलीचा तगादा लावला आहे. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले असून संपूर्ण वीज बिल माफ करा अन्यथा संघर्षास तयार राहा, असा इशारा शेकापचे चिटणीस बाबूराव कदम यांनी दिला.
यावेळी दिलीपकुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, मोेहन पाटील, ॲड. उज्ज्वला कदम, सुभाष सावंत, महेश चव्हाण, अस्लम बागवान, आशिष चिले, आदी उपस्थित होते.