कोल्हापूर : उमेदवारीत डावलल्याने नाराजी असली तरी शेतकरी कामगार पक्षाची मानसिकता विरोधी आघाडीशी जुळवून घेणारी दिसत आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे नेते व माजी आमदार संपतराव पवार यांना दिले आहेत.
माघारी दिवशीच दोन दिवसांनी एकत्रित बसून पाठिंबा कुणाला द्यायचा हे ठरवायचे निश्चित झाले होते, पण लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे बैठकीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र करण्यावर मर्यादा आल्या आहेत. याबाबत संपतराव पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अजून भूमिका ठरलेली नाही, कार्यकर्त्यांशी फोनवर बोलून ठरवू असे सांगितले. कार्यकर्त्यांना पूर्ण मुभा दिली जाणार आहे, पण यात उत्पादकांना न्याय देण्याच्या संघर्ष समितीच्या मूळ हेतूला बाधा येता कामा नये हे देखील बजावून सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले.
बाबासाहेब देवकर व केरबा पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती, पण साधे बैठकीलाही बोलावले नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी आहे, पण शेकापला कधीही सत्ता लागत नाही, गोकुळ बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही दूध उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढत राहणार, असेही पवार यांनी सांगितले.