दहिवडी : ‘कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी राष्ट्रवादीत प्रवेश करत असून, या पक्षाच्या चिन्हावरच सांगली-सातारा विधान परिषदेची निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसा शब्दही आपल्याला दिला आहे,’ अशी घोषणा शेखर गोरे यांनी केली.दहिवडी येथील माउली मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी माण-खटाव तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. ‘रासप’चे राज्य सरचिटणीस म्हणून आजपर्यंत माणदेशात कार्यरत राहिलेल्या शेखर गोरेंचा निर्णय ऐकण्यासाठी माण-खटाव तालुक्यांतील कार्यकर्ते एकत्र जमले होते. शेखर गोरे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू असून, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ‘रासप’कडून भावाविरुद्धच शड्डू ठोकला होता. यंदाच्या सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांची काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, सातारा जिल्ह्यातील मतदारांची जबाबदारी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जयकुमार हे पतंगरावांचे राजकीय मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीकडून आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे दोन काँग्रेसमधील ‘भाऊबंदकी’ उफाळून येणार, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शेखर गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2016 12:42 AM