कोल्हापूर : शतकोटी वृक्ष लागवड झालेला शेंडा पार्कचा परिसर नियंत्रणाअभावी ओपन बार बनू लागला आहे. संरक्षणासाठी वन विभागाने दोन वर्षापूर्वी चोहोबाजूंनी चरी खोदल्या आहेत; पण त्यातूनच वाट काढत तळीरामांनी हा अड्डाच केल्याचे तेथे पडलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लासमुळे स्पष्ट होत आहे.
शेंडा पार्कच्या विस्तीर्ण माळावर कृषी विभाग, कृषी महाविद्यालयाच्या ३० हेक्टर क्षेत्रावर दोन वर्षांपूर्वी शतकोटी वृक्ष योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तेथे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा व जनावरांचा वावर वाढल्याने दोन वर्षांपूर्वी आठ ते दहा फूट खोल चरी चारी बाजूंनी खोदून घेतल्या. त्यानंतर काहीसा वावर कमी झाला होता. पण गेल्या डिसेंबरमध्ये येथे आग लागल्याने हा परिसर पुन्हा एकदा खुला झाला आहे. आग लागली तेव्हा ती विझविण्यासाठी व झाडांना पाणी घालण्यासाठी म्हणून काही ठिकाणी चर बुजवून रस्ता तयार करण्यात आला. याचा फायदा उचलत आजूबाजूच्या नागरिकांचा वावर पुन्हा वाढला आहे. थेट वाहने घेऊन आत जाऊन बसत दारू पिण्याचे, बाटल्या फोडून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. चरीसह आत वृक्ष लागण झालेल्या ठिकाणीही बाटल्यांचे ढीग दिसत आहेत. जनावरेही आत फिरू लागली आहेत. या सर्वांना रोखण्याचे काम वन विभागाचे आहे, पण आपल्याकडे देखभालीसाठीचा निधी नसल्याने आणि कर्मचारी ठेवता येत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथे बसण्यासाठी कोणाचाच धाक नसल्याने या जागेची ओळख ओपन बारच म्हणून पुढे येत आहे.
फोटो: १८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०१, ०२
फोटो ओळ: शेंडा पार्कातील वृक्षलागवडीकडे वन विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथे ओपन बार सुरू असून दारूच्या बाटल्या असे चोहोबाजूंनी पडलेल्या दिसतात. (छाया: नसीर अत्तार)