जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय काही दिवसांपासून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
अहोरात्र कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना योद्धे न थकता या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत आहेत. पालिकेकडून सर्वतोपरी तयारी असेलही, पण दररोज मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार होत असल्याने यासाठी लागणारे साहित्य लाकडे, शेणी यांची कमतरता होणे स्वाभाविक आहे. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित झाले होते.
याचा विचार करून मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष व सानिका फौंडेशनचे संस्थापक दगडू शेणवी यांनी आपल्या युवा सहकाऱ्यांमार्फत शहरातून तसेच आजूबाजूच्या गावातून शेणी संकलित करण्याचे आवाहन केले होते. याला अनुसरून दोन दिवसांत तब्बल पाच हजार शेणी गोळा झाल्या. आज त्या टेम्पोमधून कोल्हापूरला पाठविण्यात आल्या. भविष्यातही अशीच मदत करू, पण अशा पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी साहित्य गोळा करण्याची वेळ येऊ नये अशी भावना दगडू शेणवी यांनी व्यक्त केली. या उपक्रमात सूरज मुसळे, जगदीश चितळे, सागर पाटील, दीपक शेणवी, ओंकार म्हेतर, अवधूत शेणवी, विकास पाटील, सागर सापळे यांनी सहभाग घेतला.
फोटो ओळ :- मुरगूड येथून सानिका फौंडेशनच्या वतीने कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणी संकलित करताना कार्यकर्ते.