कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीतील मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी लाखो टन शेणी व लाकूड दरवर्षी लागते. त्याला पर्यावरणपूरक पर्याय म्हणून महापालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर ब्रिकेटस् (मोक्षकाष्ठ) वापरण्यास परवानगी दिली आहे. शेतकरी पीक घेऊन झाल्यानंतर जो पालापाचोळा उरतो त्यापासून बायोमास बिक्रेटस् बनवले आहेत, अशी माहिती प्रशांत मंडलिक यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पीक घेतल्यानंतर त्यातून उरलेला पालापाचोळा खासकरून सोयाबीन वेस्ट, काॅटन स्टाॅक बेस्ट, साॅ-डस्ट, बगॅस, प्रेसमीड गाउंड नटस्, सूर्यफूल वेस्ट, उसाचे पाचट, मका वेस्ट, बाजरी वेस्ट आदींपासून ते बनविले जाते. हे लाकूड व कोळसा याला पर्यायी आहे. याला बाॅयलरमध्ये इंधन म्हणून जाळले जाते. दरवर्षी लाखो टन ॲग्रोवेस्ट तयार होते. यापासून बिक्रेटस् बनविले गेले, तर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या ब्रिकेटस् (मोक्षकाष्ठ)चे फायदे अनेक आहेत. एक शव जाळण्यासाठी किमान २५० किलो लाकूड व ६०० शेणी लागतात. या मोक्षकाष्ठाचा वापर केल्यास शेणी व लाकूड ५० टक्के कमी लागेल. लाकडामध्ये २० टक्के पाण्याचा अंश असतो, तर यात ते ३ ते ५ टक्के प्रमाण असते. त्यामुळे ज्वलनशील क्षमता त्याची अधिक आहे. या मोक्षकाष्ठाचा वापर सध्या मुंबई (भांडूप), अकोला, यवतमाळ, सांगली, नाशिक, नागपूर, इंदोर, जयपूर आदी ठिकाणी सुरू आहे. याचा वापर झाल्यास लाखो झाडे आपण वाचवू शकतो.