ज्योती पाटील,
पाचगाव : प्रभाग क्रमांक ६१, सुभाषनगर हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने या प्रभागातून महापालिकेत जाण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. येथून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी नेत्यांकडे लॉबिंग सुरू केल्याने या प्रभागातील निवडणूक अटातटीची होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उमेदवारी नाही मिळाली तर अनेकजण बंडाचा झेंडा खांद्यावर घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याची डोकेदुखी नेत्यांसमोर उभी ठाकण्याची शक्यता आहे. शहरातच मोडणाऱ्या या प्रभागात मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे. या प्रभागात चर्मकारांची संख्या जास्त आहे. १० ते १२ कॉलन्यांनी मिळून बनलेला या प्रभागाचा विस्तार सुभाष नगरचौकापासून एसएससी बोर्ड कार्यालय ते वर्षा नगर, म्हाडा कॉलनी इथपर्यंत आहे. १९९० पासून २००५ पर्यंत या प्रभागाचे भूपाल शेटे व त्यांच्या पत्नी शशिकला शेटे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. २००५ मध्ये नंदू गुर्जर याच प्रभागातून महापालिकेत गेले होते. तर २०१० ते २०२० पर्यंत सतीश घोरपडे व सविता घोरपडे यांनी या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले. शेटे व घोरपडे या दोन कुटुंबांनी या प्रभागावर वर्चस्व गाजविले आहे.
गतवेळी या प्रभागात भाजप-ताराराणी आघाडीच्या सविता घोरपडे यांनी काँग्रेसच्या कौसर बागवान यांचा पराभव केला होता. सध्या हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने येथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडत आहेत. काँग्रेसकडून भूपाल शेटे यांनी शड्डू ठोकला आहे. विशेष म्हणजे गतवेळी पत्नीच्या निसटत्या पराभवाचे शल्य पुसून टाकण्यासाठी इस्माईल बागवान यांनाही काँग्रेसकडून उमेदवारी हवी आहे. सध्या काँग्रेसकडून भूपाल शेटे यांचेच नाव आघाडीवर आहे. काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर इस्माईल बागवान राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधू शकतात. ताराराणी आघाडीकडून दिलीप गायकवाड, महेश वासुदेव व विशाल गवळी यांची नावे आघाडीवर आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून प्रसाद पोवार चाचपणी करीत आहेत. आम आदमी पार्टीकडून सूरज सुर्वे यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीचे संकेत मिळत असले तरी खरी लढत काँग्रेस व ताराराणीआघाडीमध्येच हाेण्याची चिन्हे आहेत.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
: सविता घोरपडे : ( ताराराणी) १८५६,
कौसर बागवान : (कॉंग्रेस) १४८०,
वंदना खतकर : (राष्ट्रवादी) २७३,
अर्चना भुरके : (शिवसेना) ६०.
कोट : गेल्या पाच वर्षांत या प्रभागात दोन ते अडीच कोटी रुपयांची अनेक विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडविल्या आहेत. यामध्ये रस्ते, गटर्स, विरंगुळा केंद्र, गार्डन, ड्रेनेज लाईन, अमृत योजनेचे काम अशी अनेक कामे मार्गी लावली आहेत. आम्ही अनेक वर्षे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व केले असून यापुढे दुसऱ्यांना संधी मिळावी व त्यांनाही प्रतिनिधीत्व करता यावे यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.
सविता घोरपडे, विद्यमान नगरसेवक ( ताराराणी)
सोडवलेले प्रश्न
: अंतर्गत रस्ते,
विरंगुळा केंद्र,
प्रभागातील गटर्स,
पाण्याच्या पाईपलाईन,
ड्रेनेज,
गार्डन.
प्रभागातील समस्या :
प्रभागातील अनेक कचराकुंड्या फुटल्याने कचरा रस्त्यावर. अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो.
प्रभागातील रस्ते उखडले असल्याने वाहनधारकांना त्रास. वेळेत स्वच्छता होत नसल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जातो.