विश्वास पाटीलकोल्हापूर : राजकीय वैर जरूर होते, परंतु त्यांनी कधीही एकमेकांवर कंबरेखालील वार केले नाहीत. दोघांनाही राजकारण कळू लागल्यावर जो झेंडा हातात घेतला तो आजअखेर खाली ठेवला नाही. पक्षाशी, विचाराशी गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. दोघेही आयुष्यभर जातीयवादी पक्षांच्या वळचणीला कधी गेले नाहीत. तरीही त्यांच्यात चार पिढ्यांमध्ये राजकीय विरोध सुरू राहिला. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने हा तब्बल पाच तपांचा विरोध मागे टाकून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार व काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांच्यात राजकीय समझोता झाला आहे. हा कारखाना निवडणुकीसाठी तडजोड झाली असली तरी ती यापुढेही कायम राहण्याची शक्यताच जास्त आहे. त्याचा परिणाम करवीर विधानसभेसह जिल्हा परिषद निवडणुकीवरही होणार आहे.करवीर तालुक्यातील सडोली खालसा हे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे भोगावती नदीच्या काठावर वसलले संपन्न गाव. खरेतर महाराष्ट्र व कर्नाटकाला एकेकाळी बुलडोझरचे गाव म्हणून त्याची ओळख जास्त. त्या गावातील रामजी बाबजी पाटील व गणपतराव बाबूराव पवार ही दोन घराणी. मूळची तत्कालीन शेका पक्षाची विचारधारा मानणारी. पुढे दत्तात्रय रामजी पाटील यांचे घराणे काँग्रेसच्या विचारधारेकडे वळले. तेव्हापासून या दोन घराण्यातला राजकीय विरोध सुरू झाला. तो संघर्षाच्या पातळीवर फारसा कधी उतरला नाही.ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून ही दोन घराणी एकमेकांच्या विरोधात लढत राहिली, परंतु निवडणूक झाली की गावातील राजकीय हवा विरून जायची. त्यावरून वाद, मारामारी कधीच झाली नाही. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीच पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारायला लावले नाहीत. दोघांचीही गावात कधी दहशत नाही. दोघांचेही गट मजबूत. ग्रामपंचायत, सेवा संस्था, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद, साखर कारखाना, जिल्हा बँकेपासून ते विधानसभा-लोकसभेपर्यंत एकमेकांच्या विरोधात कायमच लढले. त्यांना एकत्र आणण्याचे काम चौथ्या पिढीने केले. गेल्या विधानसभेला आमदार पाटील यांचा मुलगा राहुल पाटील पहिल्यांदा संपतराव पवार यांच्या घरी गेला व पाठिंबा देण्याची विनंती केली. तिथे सुरू झालेली ही समझोता एक्स्प्रेस आता कारखान्यातही पुढे धावली आहे.
सडोलीला २० वर्षे आमदारकी..पी.एन.पाटील (काँग्रेस) व संपतराव पवार (शेकाप) यांच्यात १९९५, १९९९, २००४ आणि २००९ अशा चार लढती झाल्या. त्यामध्ये संपतराव पवार दोन वेळा विजयी झाले व एकदा पी.एन.पाटील विजयी झाले. २००९ ला दोन्ही सडोलीकर शिवसेनेच्या चंद्रदिप नरके यांच्याकडून पराभूत झाले.
भोगावतीत १९७३ पासून विरोधभोगावतीच्या राजकारणात या दोन्ही घराण्यांत १९७३ पासून विरोध आहे. शेका पक्षाकडून संपतराव पवार, त्यांचे चुलत भाऊ अशोकराव पवार हे उपाध्यक्ष झाले. काँग्रेसकडून दिवंगत नारायण पाटील हे उपाध्यक्ष झाले. पुढे त्यांचाच मुलगा संभाजीराव पाटील, दीपक पाटील व आता पी.एन. पाटील या चुलत भावांना कारखान्याचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली.
संस्थात्मक उभारणी..पी.एन. पाटील यांनी राजीव गांधी सूतगिरणी, श्रीपतरावदादा बँक, निवृत्ती तालुका संघ अशा संस्थांची उभारणी केली. संपतराव यांनी खत कारखान्याची उभारणी केली परंतु तो त्यांना चालवून दाखवता आला नाही. खत आधी की सूत आधी ही ईर्षा एका विधानसभा निवडणुकीत गाजली.
वैचारिक बांधीलकी..माजी आमदार संपतराव पवार व आमदार पाटील हे आयुष्यभर आपापल्या झेंड्याशी प्रामाणिक राहिले. पवार यांनी शेका पक्षाच्या लाल झेंड्याला कधी बट्टा लागू दिला नाही. विजयी व्हावे म्हणून लढायचे ही त्यांची कधीच विचारधारा नव्हती. चुकीचे होतंय त्याला विरोध या विचाराने त्यांनी राजकारण केले. पी.एन. पाटील यांनीही अनेकदा संधी येऊनही काँग्रेसशी कधीच गद्दारी केली नाही. जातीयवादी विचारधारेला विरोध हा त्यांच्यातील समान धागा राहिला.
नोकरीची संधी..पी.एन. व संपतराव यांनी मतदारसंघातील शेकडो तरुणांना नोकरीस लावले. परंतु, त्यांच्याकडून कधीच अर्धा कप चहाही घेतला नाही. दोघांनीही सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. दोघांनी एकमेकांचे चारित्र्यहनन होईल अशी टीका कधीच केली नाही. त्यांनी कधीच आरोप करताना एकमेकांचे नावही घेतले नाही. आमच्या विरोधकांना असेच ते म्हणत असत. हे दोघे त्यांच्या राजकीय जीवनात एकदाही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. पुढच्या राजकारणातही हे दोघे एका व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे.