कोल्हापूर : तीन महिन्यांत मोदी सरकारच्या कारभाराने शेतकरी देशोधडीला लागला असताना ‘स्वाभिमानी’ नेते कोठे आहेत? असा सवाल करत राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचा जराही कळवळा असेल, तर त्यांनी खासदारकीवर लाथ मारावी व बिहारमध्ये जाऊन कृषीमंत्र्यांच्या दारात बसावे, वाटल्यास रेल्वे तिकिटाची व्यवस्था करतो, पण एकदा शेतकऱ्यांच्या की सरकारच्या बाजूचे कृतीतून दाखवा, असे आव्हान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, मंगळवारी कोल्हापुरात केले. शिवसेना-भाजपवर सडकून टीका करत आर. आर. पाटील म्हणाले, लोकसभेतील यशामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या मंडळींना सभेच्या गर्दीने चोख उत्तर दिले आहे. कोणाच्या तरी लाटेवर स्वार न होता, स्वत:ची लाट निर्माण करणारी ही शाहू महाराजांची भूमी असल्याचे सांगत अशा पुरोगामी भूमीतून राष्ट्रवादी नंबर वन करण्याचा निर्धार करत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब येथील पोटनिवडणुकीचे निकाल पाहिले, तर अमित शहांची जादू संपली असून, मोदींची लाटही खल्लास झाली आहे. यानंतर महाराष्ट्रात केवळ राष्ट्रवादीची लाट असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांची केविलवाणी अवस्था झाली असून, सेना भाजपच्या मागे फरफटत चाललेली पाहून स्वर्गीय बाळासाहेबांना वाईट वाटत असेल. बाळासाहेबांनी एकही खासदार नसताना ‘कमळाबाई’ला अहमदाबादच्या पुढे येऊ दिले नसते. पण, दुर्दैवाने उद्धव ठाकरे अमित शहांना पायघड्या घालत आहेत, अशा परिस्थितीत भाजप गेली उडत..., असे म्हणण्याची हिंमत उद्धव ठाकरे दाखविणार का? महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आरएसएसच्या पायावर घालण्याचे पाप रामदास आठवले व महादेव जानकर यांनी केले असून, त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस आम्ही घेतलेले निर्णय बदलण्याची भाषा करीत आहेत, पण त्यांना हा महाराष्ट्र सत्तेवर येऊ देणार नाही. धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शरद पवार यांनी उघड भूमिका घेतली आहे, राज्य सरकारने प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असताना आता तुमचे हात कोणी बांधले आहेत. महाराष्ट्रात इतकी पडझड झाल्यानंतरही अजून जागांचा निर्णय होत नाही. दानत्व फक्त राष्ट्रवादीकडे असल्याची टीकाही मंत्री पाटील यांनी काँग्रेसवर केली.बांधकाममंत्री छगन भुजबळ म्हणाले, शिवसेना-भाजपचे नेते जागा वाटपावरून एकमेकाला नवरा-बायकोची उपमा देत, उद्या १४४-१४४ असे वाटप झाले तर नवरा कोण आणि बायको कोण? याचे उत्तर द्यावे लागेल, अशी टीका करीत एकमेव बहुजन समाजाचा चेहरा असणाऱ्या मुंडे यांचे अपघाती निधन झाले, त्यांच्या निधनाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली, मात्र, त्याचा अहवाल अजून जनतेसमोर का ठेवला नाही, याचे उत्तर द्यावे. (प्रतिनिधी)वहिनींच्या कानगोष्टी.....महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा निवेदिता माने यांना विधान परिषद नाकारल्यानंतर त्यांचा गट नाराज झालेला आहे. त्यांचे एक चिरंजीव भाजपच्या संपर्कात आहेत, तर दुसरे चिरंजीव शिरोळमधून बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच श्री. पवार काल, सोमवारी दिवसभर कोल्हापुरात असताना माने भेटीस आल्या नसल्याने याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. आज, मंगळवारी त्यांनी सभेला उपस्थिती लावून तडाखेबाज भाषणही केले. सभा संपल्यानंतर त्यांनी पवार यांच्याशी काही कानगोष्टी केल्या. समर्थकांची घोषणाबाजीप्रचार सभा दणक्यात यशस्वी व्हायला हवी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार ताकद लावली होती. जलसंपदा मंत्री मुश्रीफ,खासदार महाडिक यांच्यासह सर्वच नेते-कार्यकर्ते राबत होते. प्रत्येकाने आपापले समर्थक मोठया संख्येने सभेला येतील अशी व्यवस्था केली होती. त्यामध्ये आर. के. पोवार, प्रदीप पाटील-भुयेकर, आदींचे झेंडे दिसत होते. मुश्रीफ व के. पी. पाटील बोलायला उभे राहिल्यावर त्यांच्या समर्थकांनी वाघ आला रे वाघ आला...अशी नेहमीची घोषणाबाजी करून सभास्थळ दणाणून सोडले.भाजप साधू-संतांचा नव्हे, संधिसाधूंचा पक्ष सहा महिन्यांपूर्वी विजय गावित, बबनराव पाचपुते, अजित घोरपडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आज त्यांना सन्मानाने भाजपमध्ये घेत आहेत. असे कोणते तीर्थ शिंपडले की ज्यामुळे ते पवित्र झाले. आयाराम-गयारामांना खतपाणी घालण्याचे काम भाजपने केले असून, हा पक्ष साधू-संतांचे नव्हे, तर संधिसाधंूचा पक्ष असल्याची बोचरी टीका आर. आर. पाटील यांनी केली. मुंडे, जानकर नौटंकी आहेत का?ओबीसी समाजाचे काम करतो म्हणून आपणाला देवेंद्र फडणवीस नौटंकी म्हणतात. मग गोपीनाथ मुंडे व महादेव जानकर हे नौटंकी आहेत काय ? असा सवाल भुजबळ यांनी केला. ५एकही दिवाळी सुखाची नाहीगृहमंत्री म्हणून काम करीत असताना आंदोलनामुळे एकही दिवाळी सुखाने खाऊ दिली नाही. बारामती ही आंदोलनाची पंंढरपूर करणाऱ्यांना कांद्याची निर्यात बंदी दिसत नाही का ? अशी विचारणा आर. आर. पाटील यांनी केली. आबांचा गडकरी-फडणवीसांना सल्ला सत्ता येण्यापूर्वीच भाजपमधील चार-चार नेत्यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडली आहेत. पण, गडकरीसाहेब पहिल्यांदा महाराष्ट्राचे बना, मग मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघा, असा सल्ला देत तुम्ही मुख्यमंत्री व्हायला शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा संपलेली नसल्याचा टोला आर. आर. पाटील यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
शेट्टी खासदारकीवर लाथ मारा-- आर. आर. पाटील यांचे आव्हान
By admin | Published: September 17, 2014 12:40 AM