कोल्हापूर : ‘युपीए’ सरकारने कांद्यावर निर्यातबंदी कधी घातली नाही, घातली तर चोवीस तासांत उठविण्याचे काम केले; पण मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या, मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या प्रचार प्रारंभ मेळाव्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, मागील दहा वर्षांत साखरेचे दर एका विशिष्ट पातळीवर स्थिर ठेवल्याने शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळाला; पण गेले तीन महिन्यांत सर्वच शेतीमालाची वाईट अवस्था झालेली आहे. साखरेचे दर घसरल्याने आगामी हंगामात साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढणार आहेत. अशा परिस्थितीत संसदेत निर्णय बदलण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले पाहिजे; पण काही मंडळी संसदेऐवजी बारामती व कोल्हापुरातच निर्णय बदलतात, असे वाटते असा टोलाही त्यांनी खासदार शेट्टींना लगावला. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप संपले की, किती व कोणत्या जागा येतात हे निश्चित झाल्यानंतर समविचार पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सामान्य माणूस भयभीतकेंद्रातील मोदी सरकारबाबत शंभर दिवसांतच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही; पण सरकार ज्या दिशेने पाऊल टाकत आहे, त्याने सामान्य माणूस भयभीत झाला आहे. देश चालविण्यासाठी एका टीमची गरज असते; पण ती टीम केंद्रात दिसत नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. कोल्हापुरातच यावे लागतेपवार म्हणाले, गेली ३५ वर्षांत माझ्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून करतो. कोल्हापूर माझे आजोळ असल्याने आवडत असेल हा भाग वेगळा आहे; पण रस्ता ठीक असेल तर येथील जनता पाठीशी राहते, जर ठीक नसेल तर जागाही दाखविते. त्यामुळे ठीक राहण्यासाठी कोल्हापुरात यावेच लागते.
शेट्टींनी कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे- शरद पवार :
By admin | Published: September 16, 2014 12:53 AM