अशोक पाटील ल्ल इस्लामपूरइस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी जि. प. निवडणूक लढवत असलेल्या सागर या मुलासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यांना इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची साथ आहे, तर दुसरीकडे माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शिंदे यांच्यासह माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी रात्रीचा दिवस केला आहे. खोत यांच्या विजयासाठी शिगावमध्ये सोमवारी रात्री इस्लामपूरचे नगराध्यक्ष पाटील पैसे वाटत असल्याचा आरोप झाल्यानंतर तणावपूर्ण वातावरण बनले होते. खोत व शिंदे या दोघांच्या पुत्रप्रेमात शिगाव पेटले आहे.वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणे सरड्याप्रमाणे रंग बदलत चालली आहेत. शिराळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येऊन भाजपला आव्हान दिले आहे. वाळव्यात राष्ट्रवादीविरोधात आघाडीची बिघाडी झाली आहे. यामध्ये महाडिक गट, हुतात्मा गट, स्वाभिमानी आणि काँग्रेस यांनी विकास आघाडीचे लेबल लावले असले तरी, घराणेशाही टिकविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यांनी आपापल्या मतदारसंघात राहणेच पसंद केले आहे.बागणी जि. प. मतदारसंघ खुला झाल्याने येथून निवडणूक लढविणाऱ्यांची मोठी गर्दी होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे वैभव शिंदे, उदय पाटील, संभाजी कचरे यांच्यासह इतरांनी मागणी केली होती. आ. जयंत पाटील यांनी वैभव शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या कचरे यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली होती. त्यातच विकास आघाडीकडून कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुत्राच्या हट्टापोटी त्याला उमेदवारी दिली. हा घराणेशाहीचा मुद्दा चव्हाट्यावर आला.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत विकास आघाडीने साम, दाम, दंडाचा वापर करुन राष्ट्रवादीला जेरीस आणले होते. तोच फॉर्म्युला निशिकांत पाटील यांनी शिगाव येथे वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो शिगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
बागणीमधील पुत्रप्रेमासाठी शिगाव पेटले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 11:43 PM