शिये : नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनास शियेतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. गुरुवारी शिये गावच्या हद्दीत रेखांकनाचे काम सुरू असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भुये परिसरातून सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य मार्ग क्रमांक १९४ वरून करावा या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांचा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात या मार्गावरील रेखांकनाची प्रक्रिया सुरू केली. नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी शिये ते केर्ले या भागातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या रस्त्यांमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर पिकावू शेती बाधित होणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या रेखांकनास विरोध आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता भुये, भुयेवाडी, शिये परिसरातील रेखांकन प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. याला विरोध केला असता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे, उत्तम पाटील, परशराम शिंदे, मानसिंग पाटील, के.बी. खुटाळे यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
फोटो : १५ शिये रेखांकन
शिये येथे नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनांस विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.