कोल्हापूर : शेतकºयाला विनाअट सरसकट शंभर टक्के कर्जमाफी देण्यात यावी, महापुरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, परतीच्या पावसाने उरलीसुरली पिकेही नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाचा दरवाजा ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.
दसरा चौक येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीमध्ये शेतकºयाचा आक्रोश आणि व्यथा मांडणारे फलक लावले होते; तर ‘शेती वाचवा, अन्नदाता जगवा’, ‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी’ असे फलक आंदोलकांच्या हातांत झळकत होते. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी आंदोलकांनी बंद फाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखताना पोलिसांशी झटापट होऊन काहीवेळ गोंधळ उडाला. यावेळी संपतराव पवार-पाटील व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आंदोलकांनी फाटकासमोरच ठिय्या मारत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना संपतराव पवार-पाटील यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत व शेतकºयांना कर्जमाफी अद्याप मिळालेली नसून ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकरी वीज, महसूल, ग्रामपंचायत यातील कोणतेही सरकारी देणे देणार नाहीत, असा इशारा संपतराव पवार-पाटील यांनी दिला.यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मागण्या अशा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनापात्र शेतकºयांना कर्जमाफीत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापारी, शेतकºयांना मूल्यांकन करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, कृषी वीजपंप पाईपलाईन मिळावी, वीज मीटर बदलून कृषिपंपाची बिले माफ करावीत, सरकारी पाणीपट्टी माफ करावी, चालू ऊस गळीत हंगामाकरिता कृषिमूल्य आयोगाने ‘एफआरपी’ची किंमत बदललेली नाही, ती वाढवावी, उसाची ‘एफआरपी’ ऊस कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसांत देण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती बंदीचा निर्णय मागे घ्यावा.
आंदोलनात जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबूराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार-पाटील, वसंत कांबळे, अमित कांबळे, राजेंद्र देशमाने, उज्ज्वला कदम, बाबासाहेब देवकर, एकनाथ पाटील, संजय डकरे, सुशांत बोरगे, आदींसह शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते