कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे दर्शविणारा ‘श्रेय नामावलीचा’ गेल्या सहा महिन्यांपासून झाकून ठेवण्यात आलेला फलक अखेर मंगळवारी उघडण्यात आला. ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संग्रहालय संचालकांना विचारणा करून संबंधित फलक खुला करायला लावला.शिवाजी विद्यापीठातील भाषा भवन या इमारतीमधील वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयात ‘श्रेय नामावलीचा’ फलक कागदाने झाकून ठेवला होता. याबाबत लोकमत हेल्पलाईन न्यूज अंतर्गत सोमवारच्या अंकात ‘लोकमत’ने ‘विद्यापीठात श्रेय नामावलीवरून राजकारण’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. यावर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली. यावेळी देवणे यांनी ‘लोकमत’च्या या वृत्ताचे कात्रण त्यांना दाखविले. यावर डॉ. शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिष्टमंडळाला वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयाच्या संचालक डॉ. पद्मा पाटील यांना फलक खुला करण्याचा आदेश दिला. तसेच शिष्टमंडळाला डॉ. पाटील यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार देवणे यांनी शिष्टमंडळासह संग्रहालय संचालक डॉ. पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने डॉ. पाटील यांना संबंधित श्रेयनामावलीचा फलक झाकून का ठेवला, अशी विचारणा केली. शिवाय तातडीने हा फलक खुला करण्याची मागणी केली. यावर डॉ. पाटील यांनी, २००५ ला वि. स. खांडेकर यांचे संग्रहालय अस्तित्वात आले तेव्हा या फलकाचे अनावरण झाले होते. हा फलक दहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर धूळ बसली होती, शिवाय या फलकावरील नावांचा रंग गेल्याने तो झाकला होता, असे स्पष्ट केले. शिवसेनेच्या शिष्टमंडळात प्रसाद आडनाईक, वैभव जाधव, मयूर कांबळे, ऋतुराज पाटील, कुमार पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)विद्यापीठाची वेगळी ओळख असलेल्या वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांचे श्रेय देणे महत्त्वाचे आहे. या व्यक्तींना न्याय देण्यासह संग्रहालय उभारणी करणाऱ्यांची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी श्रेयनामावलीचा फलक खुला राहणे आवश्यक होते. त्यासाठी कुलगुरुंची भेट घेऊन हा फलक खुला केला. विद्यापीठातील या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार.- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख
स्मृतिसंग्रहालयासाठी झटणाऱ्यांना मिळाले ‘श्रेय’
By admin | Published: January 06, 2016 12:02 AM