दोन्ही आघाडी प्रमुखांची प्रतिष्ठा पणास लागलेल्या शिंपे येथील ग्रा. पं. निवडणुकीत माजी उपसरपंच पै. कृष्णा लाड-पाटील, गणपतराव पाटील, बाजीरावनाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने विरोधी जुगाईदेवी ग्रामविकास आघाडीचा पराभव करत सत्तांतर घडवून आणले. या ठिकाणी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने पाच जागांवर विजय संपादन करत सत्ता काबीज केली, तर विरोधी जुगाईदेवी ग्रामविकास आघाडीला चार जागा मिळाल्या. माजी उपसरपंच पै. कृष्णा लाड व जुगाईदेवी आघाडीचे प्रमुख माजी सरपंच सदाशिव पाटील यांच्यातील लक्षवेधी लढतीत पै . कृष्णा लाड-पाटील यांनी बाजी मारली. या ग्रा. पं. निवडणुकीत जुगाईदेवी आघाडीचे उमेदवार उदय बाबूराव पाटील यांनी गावात सर्वाधिक १५३ मंताचे मताधिक्य घेत मोठा विजय संपादन केला.
अत्यंत चुरशीने झालेल्या शिरगाव ग्रा. पं.च्या निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड या तीन गटांच्या आघाडीने विरोधी सत्ताधारी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. या ठिकाणी ‘विश्वास’चे संचालक मारुती आबा पाटील, भगवान पोवार, बाबासो नांगरे-पाटील, तुकाराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील निनाईदेवी ग्रामविकास आघाडीने नऊ पैकी पाच जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली.