अशोक पाटील -- इस्लामपूर -विधानपरिषदेच्या २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार विलासराव शिंदे यांच्याविरोधात नानासाहेब महाडिक यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम आणि आमदार जयंत पाटील यांनी एकत्रित येऊन महाडिक यांचा पराभव केला होता. परंतु नुकत्याच झालेल्या एका समारंभात खुद्द विलासराव शिंदे यांनी नानासाहेब महाडिक यांचे पुत्र, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक यांचा सत्कार करून जयंत पाटील गटाला हुलकावणी देण्याची खेळी केली आहे.वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे हे राष्ट्रवादीत असले, तरी त्यांचे गट मात्र स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. आष्टा पालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील गटाचे नेतृत्व वाळव्याचे दिलीपराव पाटील करतात, तर या दोघांविरोधात महाडिक गट सक्रिय असतो. तरीसुध्दा आष्टा पालिकेवर विलासराव शिंदे यांचेच वर्चस्व असते. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विलासराव शिंदे यांनीही दावा केला होता. परंतु जयंत पाटील यांनी त्यांना डावलून दिलीपरावांना संधी दिली. यामध्ये जयंतरावांची खेळी असल्याचे बोलले जात होते. विलासराव नाराज होऊ नयेत म्हणून जयंत पाटील यांनी त्यांच्या गटाच्या आनंदराव पाटील यांना बाजार समितीचे सभापतीपद देऊन बोळवण केली आहे.जयंत पाटील आणि शिंदे गटाच्या राजकारणात महाडिक गटाचे अस्तित्व जाणवत नव्हते. येणाऱ्या काळात जयंत पाटील यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी महाडिक गट सक्रिय झाला आहे. त्याच अनुषंगाने नजीर वलांडकर यांनी वाळवा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विलासराव शिंदे यांनी राहुल महाडिक यांचा सत्कार करुन जयंत पाटील गटाला हुलकावणी दिली आहे. यावेळी झालेल्या भाषणात ते म्हणाले, माझे व महाडिक कुटुंबाचे संबंध राजकारणविरहीत व मैत्रीचे आहेत. समाजहितासाठी काम करताना राजकीय अभिनिवेश दूर ठेवावे लागतात. पक्षाचे काम करताना आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहतो. परंतु एरव्ही समाजासाठी एकत्र येतो. यावेळी त्यांनी नानासाहेबांशी असलेल्या मैत्रीचे किस्सेही सांगितले.उपस्थितीवरून राजकीय समीकरणेया कार्यक्रमास कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नामदेवराव मोहिते, सुरेश शिंदे, नगरसेवक कपिल ओसवाल, वैभव पवार आदींची उपस्थिती होती. यामध्ये विलासराव शिंदे सोडले तर जयंतरावांना मानणारे कोणीही उपस्थित नसल्यामुळे या सत्कार समारंभाची चर्चा चांगलीच चर्चिली जात आहे. आम्ही सर्व वसंतदादा पाटील यांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. परंतु कालांतराने आमच्यात फूट पडली. त्यामुळे विलासराव शिंदे, नानासाहेब महाडिक यांचे स्वतंत्र गट निर्माण झाले. विलासराव शिंदे यांना आम्ही राजकारणातील मार्गदर्शक मानतो.- राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य.
शिंदे-महाडिक यांच्यात औपचारिक दिलजमाई
By admin | Published: October 04, 2015 10:38 PM