कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठीचा महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी दाखल्याच्या नोंदीचा अहवाल शनिवारी (दि.९) राज्य शासनाच्या शिंदे समितीला सादर होणार आहे. ही समिती कोल्हापूर दौऱ्यावर येणार होती मात्र हा दौरा रद्द झाला असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे पुण्याला जाऊन समितीला जिल्ह्यात सापडलेल्या नोंदी व अभिप्रायासह आपला अहवाल सादर करतील. जिल्ह्यात लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापड़ल्या आहेत.मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा-कुणबी जातीच्या नोंदीची शोधमोहिम हाती घेण्यात आली. कोल्हापुरात देखील १९६७ पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानकालीन सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज हे कागदोपत्री पुरावे शोधण्याचे काम गेले दीड महिना सुरू होते. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. या विभागाकडून सुरुवातीला रोजच्या रोज सापडलेल्या कुणबी दाखल्यांची संख्या जाहीर केली जात होती. तहसिल कार्यालयाांकडील रेकॉर्डमधून सर्वाधीक नोंदी सापडल्या यासह भूमी अभिलेख, मुद्रांक शुल्क, महापालिका, नगरपालिका, शिक्षण, पुराभिलेख, कळंबा कारागृह, वक्फ बोर्ड, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अशा विविध कार्यालयांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. आतापर्यंत जिल्ह्यात लाखाहून अधिक नोंदी सापडल्या आहे. मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती कोल्हापूरला भेट देणार होती, मात्र हा दौऱा रद्द झाला असून जिल्हाधिकारी स्वत: शनिवारी (दि.९) अहवाल सादर करणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदीचा अहवाल येत्या शनिवारी शिंदे समितीला सादर करणार
By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 07, 2023 5:42 PM