कोल्हापूर : उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाल्याने अडचणीत आलेले शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी अटीतटीच्या लढतीत हातकणंगले मतदारसंघातून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. त्यांनी १४ हजार ७२३ मतांनी उध्दवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला आहे. माजी खासदार राजू शेट्टी हे तीन लाख मतांहून पिछाडीवर राहिले आहेत.शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलाव परिसरातील गोदामामध्ये हातकणंगले मतदारसंघाची मोजणी सकाळी सुरू झाली. सुरूवातीपासूनच सरूडकर हे थोड्या फरकाने का असेना पण सातत्याने आघाडीवर होते. बाराव्या फेरीअखेर सत्यजित पाटील-सरूडकर हे ६,२९० मतांनी आघाडीवर होते. परंतू १४ व्या फेरीत त्यांचे हे मताधिक्य निम्म्यावर आले. यानंतर परिस्थिती बदलून धैर्यशील माने यांची आघाडी सुरू झाली आणि १६ व्या फेरीअखेर माने ७ ३५१ मतांनी आघाडीवर आले. यानंतर मात्र शेवटच्या फेरीअखेर माने यांनी मताधिक्य सोडले नाही.या दोघांच्या अटीतटीच्या लढतीत माजी खासदार राजू शेट्टी मात्र फारच पिछाडीवर राहिले. ते सरूडकर यांच्यापेक्षा ३ लाख मतांनी मागे राहिले. दरम्यान माने यांच्या विजयाची खात्री झाल्यानंतर त्यांच्या कोल्हापुरातील रूईकर कॉलनीच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. माने यांना शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि वाळव्याने पाठबळ दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माने यांच्या विजयासाठी राबवलेली यंत्रणा माने यांना विजयापर्यंत घेवून गेली. या मतदारसंघात आमदार विनय कोरेंसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे श्रमही कारणीभूत ठरले.
Hatkanangale Lok Sabha Result 2024: अटीतटीच्या लढतीत धैर्यशील मानेंची बाजी, ठाकरे सेनेचे सत्यजित पाटील पराभूत
By समीर देशपांडे | Published: June 04, 2024 6:27 PM