कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील सातवेपैकी शिंदेवाडी येथील तरुणास न्यायालयाने दोषी ठरविले. अक्षय भानुदास शिंदे (वय २४) असे त्याचे नाव असून त्याला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५० हजार रुपये नुकसान भरपाईसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी ठोठावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, अक्षय शिंदे याची २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. तिला लग्नाचे अामिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहून तिला बाळ झाले. पण या स्त्री जातीच्या बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याचे काम विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुरू झाले. विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. यापैकी पीडित मुलीसह, फिर्यादीसह साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. युक्तिवादानंतर न्यायालयाने शिंदेला दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरीसह ५० हजाराची भरपाई व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाला ॲड. भारत शिंदे, ॲड. महादेव चव्हाण, तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. जाधव, सहायक फौजदार उदय पाटील यांचे सहकार्य लाभले.