कोपार्डे : शिंगणापूर बंधारा ते चिखली दरम्यानच्या रस्त्याला माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता. या रस्त्याचे काम सुरू झाले, पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्याने शिंगणापूर बंधाऱ्यापासून पूर्वेला १०० मीटर रस्त्याचे काम एक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे खचलेल्या रस्त्यावरून अवजड वाहने जाणे शक्य नसल्याने एवढा निधी खर्च होऊनही हा रस्ता निरुपयोगी ठरत आहे.
शहरातून जाणारी अवजड वाहतूक बाहेरुन घालवण्यासाठी शिंगणापूर - चिखली रस्त्याला चंद्रदीप नरके यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या रस्त्याचे बहुतांश काम पूर्णही झाले. मात्र, या रस्त्यात ज्यांची जमीन गेली त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने त्यांनी शिंगणापूर बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूचे ५० ते ६० मीटरचे काम अडविले आहे. परिणामी या रस्त्याचे काम एक वर्षांपासून रखडले आहे. भरपाई द्या मगच काम सुरु करा, अशी भूमिका संबंधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होणार याकडे लक्ष लागले आहे.
चौकट : चिखली गावच्या सात ते आठ शेतकऱ्यांची जमीन शिंगणापूर बंधारा व या रस्त्यामुळे बाधित झाली आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण आजही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने या रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
कोट : या रस्त्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काम थांबले असेल तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करुन लवकरच वाहतुकीसाठी हा रस्ता उपलब्ध करून देऊ. चंद्रदीप नरके, माजी आमदार करवीर.
कोट : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी दोन वेळा बैठका घेतल्या होत्या, पण महानगरपालिकेने नुकसानभरपाई देण्यासाठी दुर्लक्ष केले. नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करून रस्त्याचे उर्वरित काम मार्गी लावणार आहे.
रसिका पाटील, जि. प. सदस्या.
फोटो
: १४ शिंगणापूर रस्ता
शिंगणापूर -चिखली रस्त्याचे रखडलेले काम.