कोल्हापूर : मालवाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेले चक्का जाम बेमुदत आंदोलन मागे घेतल्यानंतर शहरात मंगळवारी मालवाहतूक सुरळीत झाली. गेले पाच दिवस मालवाहतूक बंद असल्याने याचा जिल्ह्यातील सुमारे ५०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम जाणवला. केंद्र शासनाने मालवाहतूकदारांच्या मागण्यांसाठी समिती नेमली असून, समितीने १५ डिसेंबरपर्यंत योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नवरात्र व दसरा-दिवाळी सणांवेळी जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम जाणवणार नाही.देशातील टोलनाके बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी १ आॅक्टोबरपासून मालवाहतूकदारांचे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू होते. यामुळे गोकुळ शिरगाव, शिरोली, वाय. पी. पोवारनगर, कागल-हातकणंगले पंचतारांकित वसाहत, आदी औद्योगिक वसाहतींमधील आर्थिक उलाढालींवर परिणाम जाणवला. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे १६ हजार मालवाहतूकदार (आठ, दहा चाकी, आदी वाहने), टेम्पो १२ हजार, तर ९०० टँकर सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.मालवाहतूकदारांचे हे आंदोलन सोमवारी तात्पुरते स्थगित केले. त्यामुळे मंगळवारपासून शहरासह ग्रामीण भागात मालवाहतूक सुरळीत झाली. यामुळे नवरात्र, दसरा-दिवाळी या सणांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री व मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात १९८९ ला १३ दिवस, त्यानंतर १९९३ ला सात दिवस व २०१२ ला चार दिवस अशाप्रकारचे बेमुदत आंदोलन मालवाहतूकदारांनी केले होते. (प्रतिनिधी)बस वाहतूकआॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, सोमवारी रात्री केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांसंबंधी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेनेही आज, बुधवारी पुकारलेला बंद मागे घेतल्याचे बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.
मालवाहतूकदारांचा संप मागे
By admin | Published: October 07, 2015 12:26 AM