गणपती कोळी --कुरूंदवाड -कोणतेही सार्वजनिक काम लोकप्रतिनिधी व लोकसहभाग झाल्यास दर्जेदार कामाबरोबरच योजना पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही. याचे उदाहरण शिरढोण (ता.शिरोळ) येथील माळभागावरील बेघर वसाहतीतील रहिवाशी व ग्रामपंचायतीने लोकवर्गणी व श्रमदानातून सांडपाणी निचऱ्याचा कित्येक वर्षाचा प्रश्न पूर्णत्वास आणत आहेत. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य व आदर्शवत ठरणारा आहे. येथील माळभागावर पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने बेघर वसाहत वसविली आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या या वसाहतीला सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न नेहमी सतावत होता. या गल्लीतून गटारी बांधल्या तरी गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नसल्याने शिवाय ग्रामपंचायत या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा गंभीर प्रश्न प्रलंबितच होता. पावसाळ्यामध्ये तर हा प्रश्न अधिकच गंभीर होऊन सांडपाणी व पावसाच्या पाण्याने अनेकांच्या घरामध्ये शिरत असल्याने घाणीचे साम्राज्य, डासांची उत्पत्ती व साथीच्या आजाराने रहिवाशी वैतागले होते. गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच बिनविरोध झाल्याने गावातील राजकीय खेळींना पूर्णविराम मिळून विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये माळभागावरील बेघर वसाहतीतील प्रश्न सोडविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. या वसाहतीत गटारी बांधणे, पाण्याची निर्गत करण्याची व्यवस्था करणे याचा खर्च ग्रामपंचायतीला शक्य होणार नसल्याने सरपंच शितल शिंदे, उपसरपंच चंद्रकांत मालगावे, ग्रामपंचायत सदस्य विलास चौगुले यांनी पुढाकार घेवून या कामाला आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी वसाहतीतील रहिवाशांना सामावून घेतले व लोकवर्गणीचा प्रस्ताव ठेवला. लोकांनीही हा प्रस्ताव मान्य करत ग्रामपंचायत निधी व लोकवर्गणी आणि श्रमदानातून आठ दिवसांपूर्वी कामालाही प्रारंभ झाला. कामाचे गांभीर्य दाखविले शिरढोण येथील वसाहतीतील सांडपाणी निर्गतीचा प्रश्न नेहमीच सतावत होता. सांडपाणी निर्गत करण्याची व्यवस्थाच नसल्याने शिवाय या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष राहिल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. सध्या सरपंच शितल शिंदे या वसाहतीतच राहतात. तसेच ग्रामपंचायत सदस्य विलास चौगुले या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने त्यांनी उपसरपंच मालगावे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून या कामाचे गांभीर्य समजावून सांगितले. येथील रहिवाशांना एकत्र करुन शासनाच्या जबाबदारी बरोबर स्वत:चे कर्तव्य समजून सांगितल्याने एका चुटकीसरसी हा प्रश्न निकाला लागला. आदर्शवत उपक्रम : पाच बोळ रस्त्याचे गटारी बांधून तीन ठिकाणी नांदेड पॅटर्न शोषखड्डे बांधण्यात येत आहे. काम अंतिम टप्प्यात असून नव्या वर्षापासून येथील कित्येक वर्षाचा सांडपाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागल्याने नागरिकांतून समाधान होत आहे. लोकवर्गणी, श्रमदान व ग्रामपंचायतीचा पुढाकार यामुळे काम तर दर्जेदार झाले आहे. शिवाय कित्येक वर्षातील प्रलंबित असलेला सार्वजनिक कामाचा निपटारा लोकसहभागातून झाल्याने हा उपक्रम आदर्शवत ठरत आहे.
शिरढोणला लोकवर्गणीतून -सांडपाणी प्रश्न निकालात
By admin | Published: January 03, 2017 11:53 PM