संदीप बावचे- शिरोळ -येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांची जागा आरोग्य उपसंचालक यांच्या नावावरच नसल्याने निवासस्थाने हस्तांतराचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. जागा हस्तांतराचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. हा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे शासकीय विभागालाच ‘शासकीय काम, सहा महिने थांब’चा अनुभव येत आहे.शिरोळ गावचा वाढता विस्तार पाहता आणि आरोग्याची सुविधा जास्तीत जास्त रुग्णांना मिळावी, या हेतूने माजी आरोग्यमंत्री कै. दिग्वीजय खानविलकर यांनी शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली होती. सन २००२ पासून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजास सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग अशा जागा भरण्यात आल्या. वैद्यकीय सुविधा सुरू झाली असली तरी निवासस्थानांअभावी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुचंबना होत होती. निवासस्थानांचा प्रश्न प्रलंबित होता. शासनाच्या आरोग्य निधीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी दोन वर्षापूर्वी तीन कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली होती. दोन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर शिरोळ-घालवाड रस्त्यानजीक असणाऱ्या उजव्या बाजूकडील जागेवर ही निवासस्थाने बांधण्यात आली आहेत.पहिल्या टप्प्यात चार प्रकारच्या वेगवेगळ्या दहा क्वॉटर्स बांधण्यात आल्या आहेत. या अंतर्गत सार्वजनिक सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. तटबंदीसह रस्ते, गटारी, वीज अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. तब्बल १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला निवासस्थानांचा प्रश्न आता मार्गी लागला असला तरी निवासस्थाने बांधून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी ती रिकाम्या स्थितीत पडली आहे. ही जागाच ग्रामीण रुग्णालयाचे नियंत्रण ठेवणाऱ्या आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांच्या नावावरच नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवासस्थानांअभावी कुचंबना होत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासस्थानं उपलब्ध झाल्यामुळे शिरोळसह परिसरातील रुग्णांना आता चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळणार, ही अपेक्षा फोल ठरत आहे. प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडेजागा हस्तांतरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निवासस्थाने तयार असल्याचे सांगण्यात येत असले तरी उपसंचालक कोल्हापूर यांच्या नावावर जागा नोंद झाल्यानंतरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कुंभोजकर यांनी दिली.
शिरोळला ग्रामीण रूग्णालय निवासस्थानांचे भिजत घोंगडे
By admin | Published: August 07, 2015 10:51 PM