बाजीराव फराकटेशिरगाव : राधानगरी तालुक्यात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भोगावती नदीला मोठा महापूर आला असून शिरगाव येथील नवीन पुलासाठी खर्च केलेले अकरा कोटी रुपये पाण्यात गेले असल्याचे या पुरामुळे दिसत आहे. आणखी पाच फुट उंची केली असती तर या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती.राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे मोठ्या पुलाची गरज असल्याचे दैनिक लोकमत मधुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाला मंजुरी दिली होती. त्यानंतर भुमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाले. तत्कालिन पालकमंत्री आमदार सतेज पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले. काम सुरू असताना या परिसरातील नागरिकांनी व प्रमुख नेत्यांनी पुलाच्या उंचीबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पुलांवर पाणी येणार नसल्याचे सांगितले. सध्या या नवीन पुलावर तीन चार फूट उंच पाणी आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. जर आणखी चार पाच फूट उंची वाढविली असती तर या मार्गावरून कोल्हापूर- राधानगरी - फोंडा अशी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू झाली असती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला. परंतु अधिकारी वर्गाच्या मनमानी पद्धतीने केलेल्या या कामामुळे मोठा पुल असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने अकरा कोटी रुपये खर्च केलेला पाण्यात गेला आहे.
Kolhapur: अकरा कोटी खर्चून उभारलेला शिरगावचा पूल पुराच्या पाण्याखाली, अधिकाऱ्यांचा दावा ठरला फोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 6:11 PM