कोल्हापूर : कोरोनाचे सावट असतानाही शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत शुक्रवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. सामूहिक नमाजपठणावर मर्यादा आल्याने घरातच खुदबा पठण करत कोरोनामुक्तीसाठी अल्लाहकडे दुआही करण्यात आली. शिरखुर्म्याचा आस्वादही कुटुंबीयासमवेतच लुटला.
सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईद कोरोनाच्या सावटातच साजरी झाली. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीदेखील कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह हिलाल कमिटीनेही ईद साध्या पध्दतीने आणि तीही घरच्या घरीच साजरी करावी असे आवाहन केले होते. त्याचे तंतोतंत पालन करत मुस्लिम कुटुंबात ईद साजरी झाली.
मुस्लिम बोर्डिंग पटांगणावर सामूहिक नमाजपठण होते, पण शुक्रवारी केवळ पाचच लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. मौलान मोबीन बागवान यांनी खुदबा पठण करून कोरोनामुक्तीसाठी दुआ केली. मोहल्ल्यांमध्येदेखील असेच एकेकट्याने ईद साजरी झाली. कुटुंबीय वगळता बाहेरचे कुणीही यात सहभागी होणार नाहीत, याची दक्षताही घेतली गेली. हस्तांदोलन व गळाभेटही टाळण्याकडेच बहुतांश जणांचा कल दिसत होता. ईदनिमित्त एकमेकांच्या घरी जाता येत नसल्याने फोनद्वारेच शुभेच्छा देऊन ईदचा आनंद द्विगुणित केला जात होता.
मुस्लिम बांधवांना सर्व धर्मियांसमवेत जोडून ठेवणारी कडी म्हणजे शिरखुर्मा. खास पध्दतीने बनवलेला हा पदार्थ खाण्यासाठी मुस्लिम कुटुंबामध्ये गर्दी असते, पण यावर्षी घरी बोलावता येत नसल्याची रुखरुख सलत राहिली. डबे पोहच करण्यावरही मर्यादा आल्याने यावर्षी घरातल्या घरातच सण असे या ईदला स्वरूप आल्याचे दिसले.
(फोटो आदित्य वेल्हाळ: स्वतंत्र ओळी दिल्या आहेत)