शिरोळ/जयसिंगपूर : महापुरामुळे शिरोळ तालुक्यात हाहाकार उडाला आहे. तालुक्यातील २४ गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारपर्यंत ६० हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत २००५च्या महापुराची पुनरावृत्ती झाली आहे. संपर्क तुटलेल्या गावांतील लोकांना बोटीच्या साहाय्याने स्थलांतरित करण्यात आले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तालुक्यात एनडीआरएफ, लष्कर, स्थानिक रेस्क्यू फोर्स पथक यांच्यामार्फत बचावकार्य सुरू आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोयना, वारणा, राधानगरी धरणांतून विसर्ग सुरू असल्याने तालुक्यात पुराचे पाणी वाढतच आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्यासह शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, पोलीस, शासकीय यंत्रणा यासह परिसरातील सेवाभावी संस्थांही मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत. तालुक्यातील ४१ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला असला तरी २४ गावांचा संपर्क तुटला आहे. एकूण ३० मार्ग बंद आहेत. आजअखेर १४ हजार कुटुंबांतील ६० हजार नागरिक स्थलांतरित झाले असून २५ हजार जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शिरोळ परिसरातील जावईवाडी, शाहूनगर, जुना कुरुंदवाड रोड, तर जयसिंगपूर येथे पहिल्या गल्लीत पुराचे पाणी आले आहे.
चौकट..पाणीपुरवठा बंद
कृष्णेसह वारणा, दूधगंगा व पंचगंगा नदीच्या महापुरामुळे बहुतांशी नळपाणी योजनांच्या जॅकवेलचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
चौकट..संपर्क तुटलेली गावे
चिंचवाड, घालवाड, कवठेसार, खिद्रापूर, अकिवाट, कनवाड, कुटवाड, शिरटी, हसूर, बस्तवाड, तेरवाड, कुरूंदवाड, नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, जुने दानवाड, गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, औरवाड, गौरवाड, नवे दानवाड, राजापूर, राजापूरवाडी आदी चोवीस गावांचा संपर्क तुटला आहे.