३३ गावांतील निवडणुकीकरिता २४२ केंद्रांवर मतदान झाले. केंद्रावर आलेल्या मतदारांचे थर्मल टेस्टिंगबरोबर सॅनिटायझर देऊन केंद्रात प्रवेश दिला जात होता. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. उमेदवार व कार्यकर्त्यांची मतदान केंद्रांवर एकेक मतासाठी धावपळ सुरू होती. वाहनांचा वापर करून उत्साही कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्राकडे घेऊन येत होते. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३३ गावांतील एकूण ३७.०७ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५६.८९ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर शेतमजूर मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. ३.३० वाजता ७३.०३ टक्के मतदान झाले होते. यामुळे रंगत वाढली होती. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक सुवर्णा मसणे, नायब तहसीलदार संजय काटकर, पी.जी. पाटील यांनी मतदान प्रक्रिया राबविली.
.............
काही ठिकाणी वादावादीचे प्रकार
चिपरी येथे मतदान केंद्रावर गर्दी झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीचा प्रकार घडला. जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासणे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शुभांगी शिंदे यांच्या गावातील निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली, तर घोसरवाड येथे मतदान केंद्रात सेल्फी काढणाऱ्याला पोलिसांनी प्रसाद दिला. शिरढोण येथे आरक्षणाच्या वेगळ्या रंगीत मतपत्रिकेवरून वाद झाला.
..........
वर्चस्वासाठी पक्षांकडून फिल्डिंग
तालुक्याच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळेच अतिशय चुरशीने निवडणूक पार पडली. ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा पाया असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आले होते. गटातटाची निवडणूक झाली असली तरी ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी राजकीय पक्षांनीदेखील फिल्डिंग लावल्याचे मतदानाच्या दिवशी दिसून आले.