कोल्हापूर : करवीरसह शिरोळ, चंदगड आणि पन्हाळा या तालुक्यांतील पंचायत समित्यांचे सभापतिपद शुक्रवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत खुले राहिले. अपेक्षेप्रमाणे राधानगरी तालुक्यात अनुसूचित जातीसाठी सभापतिपद आरक्षित झाले. यापूर्वी सोमवारी २३ जानेवारीस काढण्यात आलेल्या सोडतीत याच तालुक्याच्या आरक्षणाबाबत नागरिकांनी हरकत घेतल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ती रद्द केली होती. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ताराराणी सभागृहात ती पुन्हा काढण्यात आली.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे. त्याचाच भाग असलेल्या सभापतींच्या आरक्षण निश्चितीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार सोमवारी (दि. २३) ही प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु त्यामध्ये राधानगरी पंचायत समितीच्या आरक्षणास डॉ. सुभाष इंगवले व उमेश शिंदे यांनी हरकत घेतली. त्या दिवशीच्या जाहीर आरक्षणामध्ये या तालुक्यात ‘नागरिकांचा मागासवर्ग’ या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. तुम्ही ज्या बेसच्या आधारे ही प्रक्रिया राबविली आहे, तीच चुकीची असल्याचे शिंदे-इंगवले यांचे म्हणणे होते. प्रशासनाने त्याची चौकशी केल्यावर तथ्य आढळल्याने रात्री आरक्षण सोडतच रद्द केली व नव्याने सोडत घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही सोडत झाली. परंतु, जेवढी आरक्षित पदे तेवढेच तालुके उपलब्ध असल्याने चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्याची गरजच पडली नाही. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (महसूल) व तहसीलदार बी. जी. गोरे यांनी या प्रक्रियेत भाग घेतला.बदलणार नाही नव्हं...?आरक्षण सोडत पूर्ण झाल्यावर लगेचच एका नागरिकाने ‘साहेब, आता पुन्हा हे आरक्षण बदलणार नाही नव्हं...?’ अशी खोचक विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही आक्षेप नाही घेतला तर बदलणार नाही,’ असे स्पष्टीकरण केले. त्याशिवाय आक्षेप वैध असेल तर प्रशासन त्याची नक्कीच नोंद घेते, अशीही पुस्ती जोडली.वीरेंद्र मंडलिक आता बोरवडे मतदारसंघातूनकागल पंचायत समितीचे सभापतिपद खुले झाले असते तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र हा पंचायत समितीची निवडणूक लढविणार होता व भूषण पाटील हे बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार होते; परंतु आता तिथे सभापतिपद महिलेला गेल्यामुळे वीरेंद्र मंडलिक यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी नक्की मानली जाते.
करवीरसह शिरोळ पन्हाळा झाले खुले
By admin | Published: January 28, 2017 12:57 AM