शिरोळ : स्वत:च्या पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या शिरोळ पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला यांना जिल्हा पोलिस प्रमुखांनी सेवेतून निलंबित केले आहे. मुल्ला यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. मुल्ला यांनी तीनवेळा लग्न केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली.पोलिस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी २०१९ च्या दरम्यान विवाह झाला होता. गोंदिया येथे सेवा बजावत असताना आफरीन यांच्यासोबत मुल्ला यांचा सातत्याने वाद होत होता. यावेळी गोंदियातील केशारी पोलिस ठाण्यात आफरीन यांनी शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद झाला होता.त्यावेळी इम्रान यांच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती. त्याचदरम्यान पत्नी आफरीन यांनी पाठपुरावा केल्यानंतर २०१५ साली पोलिस निरीक्षक मुल्ला यांचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली. कायदेशीररित्या घटस्फोट झाल्याची माहिती न देता इम्रान यांनी आफरीन यांच्याशी विवाह केल्याचे देखील समोर आले. दरम्यान २३ जून २०२४ रोजी पोलिस निरीक्षक मुल्ला यांनी तिसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलिस ठाण्यात आफरीन यांनी तक्रार दिली. कारवाई होत नसल्याने माहिती अधिकारात त्यांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. इम्रान यांच्याकडे चौकशीनंतर माझं तिसरं लग्न झालेलं नसून सुहानाकुमारी ही माझी मैत्रीण आहे, असा खुलासा केला होता. दरम्यान, मुस्लीम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून लग्न केल्याची माहिती देखील चौकशीदरम्यान इम्रान यांनी दिली आहे. त्यामुळे तिसरे लग्न मी कायदेशीररित्या केल्याची माहिती देखील त्यांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे इम्रान यांनी आतापर्यंत तीनवेळा लग्न केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने त्यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुल्ला यांना निलंबित केल्याची माहिती शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली.
Kolhapur: PSI'ने फसवून तीन लग्न केली, पत्नीने तक्रार दिली; पोलिस प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:07 IST