संदीप बावचे
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील १० हजार ९६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या १८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. बाधितांची संख्या घटली असली तरी कोरोना नियमांचे पालन नागरिकांनी करणे तितकेच गरजेचे आहे.
एप्रिलपासून शिरोळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, अब्दुललाट, उदगाव, गणेशवाडी ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. मे, जून या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनावर मोठा ताण होता. जुलै महिन्यात अतिवृष्टी व महापूर त्यातच कोरोना महामारी अशा तिहेरी संकटात प्रशासन सापडले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करून आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सक्षमपणे परिस्थिती हाताळली.
गेल्या पाच महिन्यांत शिरोळ तालुक्यात ११ हजार ४२१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये १० हजार ९६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर २१० जणांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर अत्यल्प आहे. शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेने कडक निर्बंध लावून जनजागृती केली. सध्या तालुक्यात १८३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
तिसऱ्या लाटेसाठी तयारी
शासकीय यंत्रणेने सिध्दिविनायक, जयसिंगपूर, उदगाव, कुंजवन, तर आगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरू केले होते. सध्या उदगाव येथे एकमेव कोविड सेंटर सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सक्षम करण्यासाठी नियोजन सुरू आहे.
लसीकरणाचे आव्हान
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच प्राथमिक आरोग्य स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने सुरू ठेवले आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांनी फार मोठे काम केले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्जता करावी लागणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लसीकरण हेच आरोग्य यंत्रणेचे खऱ्याअर्थाने उद्दिष्ट आहे.