संदीप बावचे
शिरोळ : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना बेड मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत असलीतरी शिरोळकरांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मागील २९ दिवसात कोरोनामुक्त २५२ जणांनी घरवापसी केली आहे. कोरोना महामारीत मात्र डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय गंभीर असेच चित्र गेल्या आठवडाभरापासून पहावयास मिळत आहे. १ एप्रिलपासून शिरोळ तालुक्यात ८६४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सुरुवातीला जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड शहरात रुग्णांची संख्या वाढू लागली असतानाच ग्रामीण भागातही कोरोना शिरकाव झाला आहे. नगरपालिका हद्दीत २७३ तर ग्रामीण भागात ५९१ रुग्णांची गुरुवारअखेर (दि. २८) नोंद झाली आहे. यामध्ये नऊजणांचा मृत्यू झाला.
शासनाच्यावतीने तालुक्यात उदगांव, आगर येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तर जयसिंगपूर येथे खासगी ठिकाणी चार तर शिरोळ येथे दोन कोविड सेंटर सुरू आहेत. कोथळी, दानोळी येथेही ग्रामपंचायतीमार्फत कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. जयसिंगपूर येथेही शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सूचना दिल्या आहेत. दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने कोविड सेंटर सुरू आहे. ८६४ पैकी २५२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने शिरोळकरांना दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून कुठेतरी लॉकडाऊनचादेखील चांगला परिणाम दिसून आले आहे.
------------------------------
व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याची गरज
गंभीर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय पातळीवर व खासगी कोविड सेंटर सुरू असलेतरी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविण्याची गरज आहे. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.