संदीप बावचे --जयसिंगपूर भाजपने राजकीय कौशल्याचा वापर करून शिरोळ तालुक्यातही राजकीय भूकंप घडविला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नृसिंहवाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे या राजकीय वलय असणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला धक्का देत भाजपची बाजू भक्कम केली आहे. यानिमित्त आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तालुक्यात रणशिंग फुंकले आहे. यामुळे साहजिकच येणाऱ्या निवडणुकीत या नेत्यांसमोर शिरोळ तालुक्यात कमळ फुलविण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांना आमदार करण्यात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, विजय भोजे, रामचंद्र डांगे या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषद निवडणुकीच्या अगोदरपासूनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर लक्ष ठेवून ताराराणी आघाडीचे प्रमुख माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. नुकत्याच झालेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे नेते एकत्र आले होते. चार महिन्यांपासून बहुजन विकास आघाडीतील या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी व्यूहरचना सुरूहोती.अनिल यादव गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्यायच झाला. दोनवेळा विधानसभेचे तिकीट डावलण्यात आले. सूतगिरणी व औद्योगिक वसाहत यांच्या माध्यमातून दलितमित्र अशोकराव माने यांनी सहकाराचे जाळे विणले आहे. ते राष्ट्रवादी पक्षातून काम करीत होते. नाईक-निंबाळकर व जगदाळे यांच्या माध्यमातूनही भाजपला फायदा होणार आहे. यादव यांच्यासह बहुजन विकास आघाडीतील नेते, काही गावांचे सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिरोळ तालुक्यातील नेत्यांचा भाजपला किती राजकीय फायदा होईल, हे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, भाजपने सध्यातरी पक्षवाढीसाठी ‘राजकीय कॅश’ केले, हे मात्र निश्चित. स्वाभिमानीची भूमिकाभारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करीत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या हक्काच्या शिरोळ मतदारसंघात भाजपने पक्ष मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीतील नेत्यांना पक्षात ओढले आहे. त्यामुळे भाजपची बाजू आता तालुक्यात भक्कम होणार असून, मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जि.प. व पं. स. निवडणुकीत भूमिका कशी असणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत कोणता पॅटर्नबहुजन विकास आघाडीतील नेते भाजपमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे आता एकाकी पडले आहेत. भविष्यात त्यांना ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची भूमिका आगामी काळात काय राहणार, हे देखील महत्त्वाचे असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्षाकडून पक्षीय पातळीवर की आघाड्यांचा पॅटर्न वापरला जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये भाजप भक्कम स्थितीत
By admin | Published: January 10, 2017 11:09 PM