जयसिंगपूर : कर्नाटक हद्दीतून शिरोळ तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत; परंतु प्रादेशिक परिवहन विभागाकडून या वाहतुकीकडे सर्रासपणे कानाडोळा करण्यात येतो. त्यामुळे अशा ओव्हरलोड वाहतुकीला आळा कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दोन जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागाशी जोडला जाणारा शिरोळ तालुका दळवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बनला आहे. तालुक्यातील कागवाड-गणेशवाडी, दत्तवाड-सदलगा, दानवाड-एकसंबा या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. कर्नाटकातून दररोज शिरोळ तालुक्याच्या मार्गावर अशी वाहने सर्रासपणे धावत आहेत. रात्रीच्या वेळी अनेक ओव्हरलोड वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. कागवाड-गणेशवाडी मार्गे सहा चाकीपासून सोळाचाकीपर्यंत वाहने बॉक्साईट, लाकूड, सिमेंट, माती, वाळू अशी गौण खनिजे घेऊन वाहतूक करीत आहेत.कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातील रस्ते पक्के झाले आहेत. अन्य निधीही रस्त्यांना मिळत आहे. मात्र, कर्नाटकातील ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. अशा वाहतुकीमुळे रस्ते खचण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी रस्त्यावर खर्च केला जात आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे ओव्हरलोड वाहतुकीने डोके वर काढले आहे. गणेशवाडी-कागवाड मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीचा ट्रक व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात महिला ठार झाली होती. क्षमतेपक्षा जादा माल भरल्यामुळे ओव्हरलोड वाहनांवर चालकाचे नियंत्रण राहत नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वाहनांवर कारवाईची थेट मोहीम सुरू करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.
शिरोळ तालुक्यात ‘ओव्हरलोड’कडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:01 AM