शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : धरणातील विसर्ग आणि संततधार पावसामुळे शिरोळ तालुका महापुराच्या छायेखाली गेला आहे. महापुराच्या भीतीने नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. जनावरांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. सन २०१९ चा महापूर गृहीत धरून नागरिकांनी पै-पाहुणे व सुरक्षितस्थळी स्थलांतर व्हावे, अशा सूचना तालुका प्रशासनाने दिल्या असून पूरग्रस्त छावण्या सुरू केल्या जात आहेत. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. कुरुंदवाड आगाराच्या ४४ बस दत्त कारखाना स्थळावर स्थलांतरित करण्यात आल्या, तर आगारातील साहित्य जयसिंगपूर आगारामध्ये हलविण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफ पथकाकडून मदतकार्य सुरू आहे.
कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कुरुंदवाड, दानोळी, कवठेसार, राजापूरवाडी, अर्जुनवाडसह पूरबाधित गावातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. कुरुंदवाड येथील गोठणपूर भागातील नागरी वस्तीत सुमारे वीसहून अधिक घरांत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शहरवासीयांतून महापुराची भीती वाढली असून पूरबाधित पट्ट्यातील नागरिकांनी स्वत:हून जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर होत आहेत.
चौकट - प्रमुख मार्ग बंद
शिरोळ-नांदणी, हेरवाड-अब्दुललाट, सांगली-कोल्हापूर बायपास मार्ग, दानवाड-एकसंबा हे प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि वाढलेला पाऊस यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नद्यांमधील पाण्याची पातळी व संभाव्य पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी राज्यमंत्री यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा केला. कवठेसार, नृसिंहवाडी, कुरुंदवाड व तालुक्यातील नदीकाठावरील अनेक गावांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
फोटो - २३०७२०२१-जेएवाय-०३, ०४, ०५, ०६, ०७, ०८, ०९, १०, ११, १२ फोटो ओळ - ०३) सांगली-कोल्हापूर बायपास मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (छाया : अजित चौगुले, उदगाव) ०४) कुरुंदवाड येथील गोठणपूर भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ०५) जुने कवठेसार (ता. शिरोळ) येथे पुराचे पाणी आल्याने प्रापंचिक साहित्यासह ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यात आले. (छाया : भालचंद्र नांद्रेकर, दानोळी) ०६ व ०७) जुने कवठेसार (ता. शिरोळ) येथे पुराचे पाणी आल्याने जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. (छाया : भालचंद्र नांद्रेकर, दानोळी) ०८) नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले असून देणगी कार्यालयाजवळ पाणी आले आहे. (छाया : प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी) ०९) कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलावरून पंचगंगा नदीचे महाकाय विस्तारलेले क्षेत्र. (छाया : प्रशांत कोडणीकर, नृसिंहवाडी) १०) सांगली-कोल्हापूर महामार्गावरून कृष्णा नदीचे टिपलेले छायाचित्र. (छाया : अजित चौगुले, उदगाव) ११) औरवाड-नृसिंहवाडी पुलावरून आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुराची पाहणी केली. १२) कुरुंदवाड येथील जनावरांचे शिरोळ येथे स्थलांतरित करण्यात आले. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)