गणपती कोळी ।कुरूंदवाड : दानोळी येथील वारणा नदीवरील इचलकरंजीच्या अमृत योजनेवरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाला वारणाकाठाला बळ मिळाले असून या जनभावनेच्या रोषामागची भावना पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व शासनाने जाणून घेण्याची गरज आहे. अन्यथा जनक्षोभाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
इचलकरंजी शहराला सध्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, कृष्णा नदीतील पाणी दूषित झाल्याने शहराने वारणा नदीतून अमृत योजनेतून थेट पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात वारणा नदीवर अवलंबून असलेल्या चांदोली धरणाची पाणी क्षमता, या नदीवर अवलंबून असलेली गावे, त्यातच इचलकरंजी शहरासाठी पाणी नेण्याचा निर्णय घेतल्याने भविष्यातील पाण्याची समस्या ओळखून वारणा काठातील गावांनी या योजनेला विरोध केला आहे. मात्र, पालिका प्रशासनाने या विरोधला न जुमानता पोलीस बंदोबस्तात योजनेच्या उदघाटनाचा कार्यक्रम दानोळी ग्रामस्थांनी उधळून लावला.
योजनेला विरोध केल्याने प्रशासनाने कायद्याचा आधार घेत विरोध करणाऱ्या प्रमुख लोकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. त्यामुळे या कारवाईच्या निषेधार्थ शनिवारी संपूर्ण शिरोळ तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये पंचगंगा काठच्या गावांचा सहभाग होता.
वास्तविक या योजनेला विरोध करण्याचा पंचगंगा काठच्या गावांचा काहीच संबंध नाही. मात्र, शहराला शुध्द पाणी तेच प्यावे लागते. पालिका आणि शासनाच्या या पक्षपाती धोरणामुळे पंचगंगा काठच्या गावांनी या योजनेला विरोध करत वादात उडी घेतली आहे.
कोल्हापूरपासून इचलकरंजी शहरापर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्यांचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगेत सोडल्याने पंचगंगा पाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सांडपाण्यात इचलकरंजी शहराचा निम्मा वाटा आहे. पंचगंगा नदीवर शिरोळ तालुक्यातील बावीसहून अधिक गावे अवलंबून आहेत. मात्र, दूषित पाण्यामुळे तालुक्यातील शेतीबरोबर पशु व माणसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. कृष्णा नदी दूषित झाल्याने इचलकरंजी नगरपालिकेने शुध्द पाण्यासाठी वारणा नदीचा आधार घेतला आहे.
मात्र, पंचगंगा व पर्यायाने कृष्णा नदी दूषित करण्याला इचलकरंजी शहरच प्रामुख्याने जबाबदार आहे. शुध्द पाण्याचा पर्याय शोधताना आपल्या दूषित पाण्याचा फटका इतर गावांना बसतो आहे, याची जाणीव पंचगंगा काठच्या गावांनी, आंदोलनकर्त्यांनी करून देऊनही या प्रश्नांचे गांभीर्य शहराला नसल्याने पंचगंगा काठही संतापला आहे. पालिकेने व शासनाने कायद्याचा आधार व पोलीस बळाचा वापर करून योजना सुरू केल्यास मोठा जनक्षोभ भडकण्याची शक्यता आहे. या जनक्षोभामागची भावना ओळखून निर्णय घेणे गरजेचे आहे.
शहरवासीयांना शुध्द पाणी मिळाले पाहिजे ही तालुक्याच्या जनतेची अपेक्षा आहे. मात्र, पालिका प्रशासन, शासन कर्तव्य पार पाडत नसल्याने वाद चिघळला आहे. या वादात पंचगंगा काठच्या गावांनी भाग घेतल्याने वारणा काठाला बळ मिळाले आहे.