कोल्हापूर : शिरोळ तालुक्याला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या रूपाने तब्बल ४४ वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. शिवसेनेला तातडीने पाठिंबा देण्याचा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, जैन समाजाला प्रतिनिधित्व आणि संजय पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यामार्फत लावलेल्या ‘जोडण्या’ या सर्वांमुळेच राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली.
या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार हे १९७६ पर्यंत शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.गेले महिनाभर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या येत होत्या; परंतु त्यामध्ये यड्रावकर यांचे नाव फारसे चर्चेत आले नव्हते. कारण तीन पक्षांचे सरकार असल्याने मंत्रिपदे विभागली आहेत. त्यामुळे अपक्षांना फारशी संधी मिळण्याची शक्यता नव्हती; परंतु यड्रावकर यांनी निवडणुकीत जसा विजय खेचून आणला तसेच मंत्रिपदही खेचून आणले.
आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत त्यांनी प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड दिले. पक्षाने त्यांना दोन वेळी आमदारकीची उमेदवारी नाकारली, तरी त्यांनी धीर न सोडता व पक्षनेतृत्वावर कोणतेही आगपाखड न करता निवडणूक लढविली व यश मिळविले.राजेंद्र पाटील हे नरंदे येथील शरद कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याशिवाय कुरुंदवाडची पार्वती सूतगिरणी, यड्राव बँक, अखिल भारतीय सहकारी स्पिनिंग मिल फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. राज्यातील व देशातीलही साखर कारखानदारी अडचणीत असताना त्यांनी गेले अनेक वर्षे तो चांगला चालवून दाखविला आहे. त्यांच्या सगळ्याच संस्था चांगल्या पद्धतीने चालू आहेत.
कुणावर टीका नाही की, आगपाखड नाही. संधी मिळाली तर स्वागत, नाही मिळाली तर स्वत:चा मार्ग निर्माण करणार, ही त्यांच्या कामाची धाटणी. प्रसिद्धीची फारशी हाव नाही. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ जसे लोकांना भिडणारे काम करतात त्याच धाटणीचे काम करणारा हा नेता आहे. त्यामुळे आताचे राज्यमंत्रिपद हे आमच्या संघर्षाचे फळ आहे, अशीच त्यांच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे.खरे किंगमेकरयड्रावकर यांच्या विजयात व आता राज्यमंत्रिपद मिळण्यातही लहान भाऊ संजय पाटील यांचे प्रयत्न फारच महत्त्वाचे ठरले. पडद्याआड गाठीभेटी घेऊन गेले पंधरा दिवस त्यांनी नेटाने ताकद लावली, तिला यश आले. त्यासाठी गेले पंधरा दिवस ते मुंबईत तळ ठोकून होते.पहिल्यांदा आमदार ते थेट राज्यमंत्रीचयड्रावकर यांना आमदार होण्यासाठी अगोदर दोनवेळा पराभूत व्हावे लागले; परंतु एकदा आमदार झाल्यावर पहिल्याच प्रयत्नात थेट राज्यमंत्रिपद मिळवून तो बॅकलॉग मात्र त्यांनी भरून काढला.वडिलांची पुण्याईयड्रावकर यांचे वडील शामराव पाटील-यड्रावकर हे सहकारातील जाणते नेतृत्व. एक काळ रत्नाप्पाण्णा कुंभार व यड्रावकर यांच्यातील एकजुटीने व नंतर त्यांच्यातील संघर्षही जिल्ह्याने अनुभवला. परंतु, त्यांच्यानंतर तितक्याच नेटाने गट व विविध संस्थांची उभारणी करून राजेंद्र व संजय या बंधूनींही राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. जयसिंगपूरच्या राजकारणावरही या घराण्याची एकतर्फी सत्ता आहे.