शिरोली : येथे कबड्डी महासंग्राम २0१६ या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार सोहळ्यात कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक राज्य संघटनेचे कायर्वाह प्रा. संभाजी पाटील होते.उद्घाटनाचा पहिला सामना नागाव लायन्स आणि बालाजी पॅन्थर्स यांच्यात झाला. हा सामना नागाव लायन्स संघाने (२४-३७) असा १३ गुणांनी जिंकला. नागाव लायन्सकडून सतीश ऐतवडे, प्रसाद जाधव, रमेश मगदूम यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर दुसरा सामना शिरोली वॉरिअर्स आणि यासी चॅम्पियन्स यांच्यात झाला. हा सामना शिरोली वॉरिअर्सने दोन गुणांनी जिंकलासुरुवातीला स्पर्धेतील सर्व नऊ संघाचे खेळाडू, संघ मालक, प्रशिक्षक यांची शिरोली फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापर्यंत मिरवणूक काढली.स्पर्धेच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, जिल्ह्याला कबड्डीची मोठी परंपरा आहे. या जिल्ह्याने देशाला अनेक खेळाडू दिले आहेत. ग्रामीण भागातील हा खेळ प्रो आणि महाकबड्डीमुळे घराघरांत पोहोचला आहे. कबड्डीला चांगले दिवस आले असून, खेळाडूंना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.शिरोलीकरांनी कबड्डीला नेहमी भरभरून प्रेम दिले आहे, याची प्रचिती या स्पर्धेतून दिसून आली आहे. संयोजकांनी स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. स्पर्धेसाठी खासदार निधीतून एक लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा महाडिक यांनी केली.यावेळी आमदार अमल महाडिक यांनी शिरोलीत शासकीय निधीतून सुसज्ज असे क्रीडांगण व इनडोअर गेमसाठी प्रशस्त सभागृह बांधणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धा माझ्या मतदारसंघात होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी शिरोलीकरांना माझे सहकार्य राहील.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन खासदार महाडिक, आमदार मिणचेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी टोपचे माजी उपसरपंच तानाजी पाटील, महेश चव्हाण, सुरेश पाटील, राष्ट्रीय खेळाडू किसन पाटील, उद्योजक सलिम महात, उपसरपंच राजू चौगुले, अनिल खवरे, सुरेश यादव, शशिकांत खवरे, प्रकाश कौंदाडे उपस्थित होते.
शिरोलीत कबड्डी महासंग्रामला प्रारंभ
By admin | Published: March 24, 2016 10:08 PM